पुणे जिल्हा | रुळे गावच्या सरपंचपदी गणेश भिलारे यांची बिनविरोध निवड

वेल्हे, (वार्ताहर) – राजगड तालुक्यातील रुळे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी गणेश अंकुश भिलारे यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. भिलारे यांच्या निवडीनंतर समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आनंद साजरा केला. रुळे ग्रामपंचायतचे सरपंच अशोक तिडके यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी गणेश भिलारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी प्रशांत ओव्हाळ यांनी कामकाज पाहिले. यावेळी ग्रामसेवक गजानन पवार, उपसरपंच सुजाता कांबळे, ग्रामपंचायत सदस्या सारीका रानवडे, ममता फाळके, बाळासाहेब रानवडे, वसंतराव भिलारे, अमित सोनार, सुवास हगवणे, लाला रेणुसे, नंदू खुळे, तान्हाजी भिलारे, सागर चौधरी, शुभांगी हाळंदे, गंगा कुंभार, योगेश शेजवळ, अश्विनी जागडे व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करणार आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भविष्यामध्ये प्रयत्नशील राहणार आहे. विकास कामांच्या दृष्टीने भविष्यामध्ये शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. – गणेश भिलारे, सरपंच (रुळ, ता. राजगड)





