US India Trade: अमेरिकेकडून भारतीय औषध कंपन्यांना दिलासा; निवडक औषधांवर टॅरिफ शून्य, जाणून घ्या निर्णयाचं महत्त्व
US India Trade अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने पात्र औषधे आणि सामग्रीची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये दुर्मिळ आजारांवरील औषधे, न्यूक्लियर औषधे, प्लाझ्मापासून तयार होणाऱ्या थेरपी, प्रजनन उपचारांसाठी वापरली जाणारी औषधे, सेल थेरपी, जीन थेरपी आणि अँटीबॉडी-ड्रग कॉन्जुगेट्स यांचा समावेश आहे.

US India Trade: अमेरिकेत औषधांवरील आयात शुल्क वाढवण्याची तयारी सुरू असतानाच भारतीय औषध कंपन्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या काही निवडक औषधांना आणि औषधनिर्मितीसाठी लागणाऱ्या विशिष्ट सामग्रीला शून्य टॅरिफच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या औषधांची अमेरिकेत निर्यात करणाऱ्या भारतीय कंपन्यांना फायदा होऊ शकतो. मात्र, ही सवलत सर्व औषधांना लागू नसून ठरावीक उत्पादनांपुरतीच मर्यादित आहे.
कोणत्या औषधांना मिळणार सवलत?
अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने पात्र औषधे आणि सामग्रीची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये दुर्मिळ आजारांवरील औषधे, न्यूक्लियर औषधे, प्लाझ्मापासून तयार होणाऱ्या थेरपी, प्रजनन उपचारांसाठी वापरली जाणारी औषधे, सेल थेरपी, जीन थेरपी आणि अँटीबॉडी-ड्रग कॉन्जुगेट्स यांचा समावेश आहे. याशिवाय, रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि अणुसंबंधित धोक्यांपासून संरक्षणासाठी वापरली जाणारी काही वैद्यकीय उत्पादने तसेच प्राण्यांच्या आरोग्याशी संबंधित काही उत्पादनांचाही या यादीत समावेश आहे.
मात्र, भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या प्रत्येक औषधाला ही सवलत मिळणार नाही. अमेरिकेच्या एप्रिल महिन्यातील राष्ट्राध्यक्षीय आदेशात नमूद केलेल्या विशिष्ट औषधांनाच आणि संबंधित सामग्रीलाच ही सूट लागू होणार आहे.
२९ सप्टेंबरपासून टॅरिफची तयारी
अमेरिका २९ सप्टेंबरपासून काही पेटंट असलेल्या औषधांवर आणि त्यांच्याशी संबंधित सामग्रीवर १०० टक्के टॅरिफ लागू करण्याच्या तयारीत आहे. काही कंपन्यांसाठी हा आदेश ३१ जुलैपासून लागू झाला आहे, तर उर्वरित कंपन्यांसाठी तो २९ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
अमेरिकेच्या व्यापार विस्तार कायद्यातील कलम २३२ अंतर्गत औषधे आणि औषधनिर्मितीतील सामग्रीच्या आयातीबाबत हे बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडक उत्पादनांना मिळालेली शून्य टॅरिफची सवलत भारतीय कंपन्यांसाठी महत्त्वाची ठरू शकते.

Big Relief for Indian Pharma Companies from the US No Tariff on Select Drugs
जेनेरिक औषधांबाबत काय?
अमेरिकेच्या वाणिज्य विभागाच्या नोटिशीनुसार, जेनेरिक औषधे आणि त्यांच्याशी संबंधित घटकांवर कलम २३२ अंतर्गत हे औषध टॅरिफ लागू होत नाहीत. भारतासाठी ही बाब महत्त्वाची आहे. कारण अमेरिकेत होणाऱ्या भारतीय औषध निर्यातीचा मोठा हिस्सा जेनेरिक औषधांचा आहे.
भारत हा जगातील जेनेरिक औषधांचा मोठा उत्पादक देश आहे. अमेरिकेतील रुग्णालये, औषधांची दुकाने आणि आरोग्य व्यवस्थेला भारतीय कंपन्यांकडून औषधे तसेच औषधनिर्मितीसाठी लागणारे सक्रिय घटक पुरवले जातात. याशिवाय भारतीय कंपन्या पेटंट असलेली औषधे आणि विशेष उपचारांसाठी वापरली जाणारी उत्पादनेही तयार करतात.
भारतासोबत आणखी कोणते देश?
अमेरिकेच्या शून्य टॅरिफ यादीत भारतासोबत अर्जेंटिना, बांगलादेश, कंबोडिया, इक्वाडोर, अल साल्वाडोर, युरोपीय संघ, ग्वाटेमाला, इंडोनेशिया, जपान, जॉर्डन, मलेशिया, उत्तर मॅसिडोनिया, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड, लिक्टेनस्टाइन, तैवान, थायलंड, ब्रिटन आणि व्हिएतनाम यांचाही समावेश आहे. अमेरिकेच्या नोटिशीनुसार, या देशांमधून येणाऱ्या पात्र उत्पादनांना सध्याच्या किंवा भविष्यातील व्यापार आणि सुरक्षा करारांच्या चौकटीत शून्य टॅरिफ लागू होऊ शकतो.
भारतीय कंपन्यांसाठी निर्णय का महत्त्वाचा?
या सवलतीमुळे पात्र औषधे अमेरिकेत पाठवताना भारतीय उत्पादकांना आयात शुल्काचा अतिरिक्त भार टाळण्याचा मार्ग मिळू शकतो. विशेषतः महागड्या आणि विशिष्ट उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या निर्यातीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.
दुसरीकडे, अमेरिकेचे सरकार देशांतर्गत औषधनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी टॅरिफचा वापर करत आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांना मिळालेली ही सवलत मर्यादित स्वरूपाची आहे. औषध व्यापार हा भारत-अमेरिका आर्थिक संबंधांमधील महत्त्वाचा भाग असल्याने या निर्णयाकडे दोन्ही देशांच्या व्यापाराच्या दृष्टीनेही पाहिले जात.





