China Zero Tariff: चीनचे मोठे पाऊल! 53 देशांसाठी ‘झिरो टॅरिफ’; भारत आणि अमेरिकेची चिंता वाढणार?
China Zero Tariff: १ मे पासून चीन जवळजवळ सर्व आफ्रिकन देशांतून होणाऱ्या आयातीवर 'झिरो टॅरिफ' (शून्य आयात शुल्क) लागू करणार आहे.

China Zero Tariff: जागतिक राजकारणात आपला प्रभाव वाढवण्यासाठी चीनने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. १ मे पासून चीन जवळजवळ सर्व आफ्रिकन देशांतून होणाऱ्या आयातीवर ‘झिरो टॅरिफ’ (शून्य आयात शुल्क) लागू करणार आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, यामुळे आफ्रिकन खंडातील देशांशी चीनचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार आहेत. चीनच्या या खेळीचा थेट परिणाम भारत आणि अमेरिकेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे चीनची नवी रणनीती?
चीन आधीच ३३ आफ्रिकन देशांसोबत ‘झिरो टॅरिफ’ धोरण राबवत होता. मात्र, आता ज्या ५३ आफ्रिकन देशांशी चीनचे राजनैतिक संबंध आहेत, त्या सर्वांना ही सवलत दिली जाणार आहे. यामध्ये केवळ ‘इस्वातिनी’ या देशाला वगळण्यात आले आहे, कारण या देशाचे तैवानशी राजनैतिक संबंध आहेत. तैवानला आपला भाग मानणाऱ्या चीनने या निमित्ताने आपली राजकीय भूमिकाही स्पष्ट केली आहे.
भारतासाठी मोठा संदेश –
चीनचा हा निर्णय भारतासाठी एक महत्त्वाचा संकेत मानला जात आहे. सध्या भारत अमेरिका आणि युरोपीय देशांसोबत वेगाने व्यापार करार (Trade Deals) करत आहे. दुसरीकडे, भारताचा चीनसोबतचा व्यापार घाटा मोठा आहे. भारतीय वस्तूंवर चीनमध्ये ५% ते ३५% पर्यंत सीमा शुल्क (Customs Duty) लावले जाते. चीनने आफ्रिकेला दिलेली ही सवलत पाहता, आता भारत देखील आपल्या मालावरील टॅरिफ कमी करण्यासाठी चीनवर दबाव आणू शकतो किंवा त्या दृष्टीने वाटाघाटी करू शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांना चोख प्रत्युत्तर-
तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांना दिलेले उत्तर आहे. ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लादले आहेत. अशा परिस्थितीत, “जग अमेरिकेविनाही नवीन आर्थिक युती बनवू शकते,” असा संदेश चीनने यातून दिला आहे. आफ्रिकन देश सध्या त्यांच्या व्यापाराचे विविधीकरण (Diversification) करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याचा फायदा चीन उचलत आहे.
आफ्रिकेसाठी विकासाची नवी दारे
इथिओपियामध्ये आयोजित ‘आफ्रिकन युनियन’ शिखर परिषदेदरम्यान शी जिनपिंग यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, “झिरो-टॅरिफ व्यवस्था आफ्रिकेच्या विकासासाठी नवीन संधी निर्माण करेल.” ‘बेल्ट अँड रोड’ उपक्रमाद्वारे चीनने आधीच आफ्रिकेत पायाभूत सुविधांचे जाळे विणले आहे. आता या नव्या धोरणामुळे आफ्रिकन निर्यातदारांना चीनच्या अवाढव्य बाजारपेठेत विनासायास प्रवेश मिळेल.





