भारताविरूध्द कट रचणाऱ्या दहशतवाद्याची सुटका

ढाका – बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या सरकारने अल कायदा या संघटनेच्या एका दहशतवाद्याची तुरुंगातून सुटका केली आहे. जशीमुद्दीन रहमानी असे त्याचे नाव असून तो अल कायदाशी संबंधित अंसारूल्लाह बंग्ला टीम अर्थात एबीटी या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. या दहशतवाद्याच्या सुटकेमुळे भारतासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
जशीमुद्दीन रहमानी याची सोमवारी पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. ब्लॉगर राजीब हैदर यांच्या हत्या प्रकरणात त्याला तुरूंगात ठेवण्यात आले होते. गाझीपुरच्या काशीपुर येथील अत्यंत सुरक्षित तुरूंगात त्याला ठेवण्यात आले होते. बांगलादेशातील दहशतवाद विरोधी कायद्यांखालीही त्याच्या विरोधात खटला सुरू होता.
त्याच्या संघटनेशी संबंध असलेल्या अनेक जणांना अगोदरच भारतात अटक करण्यात आली आहे. रहमानीच्या एबीटी संघटनेच्या बहार मिया आणि रेयरली मिया या दोन सदस्यांना आसाम पोलिसांनी मे महिन्यात गुवाहाटी रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले होते. एबीटी अल कायदाशी संबंधित असल्यामुळे भारतात या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे.
२०१५ मध्ये शेख हसीना यांच्या सरकारने या संघटनेवर बांगलादेशातही बंदी घातली होती. भारताच्या इशान्य भागात दहशतवादी कारवाया करण्यासाठी एबीटी आणि लष्कर ए तोयबा या दोन्ही संघटनांनी हातमिळवणी केली होतीअसे वृत्त अगोदरच भारतीय माध्यमांतून आले होते.
दरम्यान, शेख हसीना यांची बांगलादेशातील सत्ता गेल्यानंतर आणि त्यांना देशातून परागंदा व्हावे लागल्यानंतर बांगलादेशात अशा अनेक घटना घडत आहेत की त्या भारताला भविष्यात तापदायक ठरू शकतात. त्यातील प्रमुख बाब म्हणजे जे भारतविरोधी घटक आहेत त्यांची क्रमाक्रमाने सुटका केली जात असून हे भारतासमोर मोठे आव्हान असणार आहे.





