रशियाबरोबरचे संबंध मजबूत आणि स्थिर; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

मॉस्को – रशिया आणि भारतादरम्यानचे संबंध खूप मजबूत आणि स्थिर आहेत, असे प्रतिपादन रशियाच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गी लावरोव यांच्याशी जयशंकर यांनी आज सहकार्याच्या विविध मुद्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये आंतरराष्ट्रीय संरक्षण विषयक परिस्थिती, संघर्ष आणि तणावांच्या मुद्यांवरही चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे नियमितपणे एकमेकांच्या संपर्कात असतात. या वर्षातली ही सातवी भेट आहे. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत आणि स्थिर आहेत. विशेष दर्जा प्राप्त भागीदारीचे संबंध दोन्ही देशांकडून जपले गेले आहेत, असे त्यांनी आवर्जुन नमूद केले.
या वर्षात भागीदारीचे वेगवेगळे आयाम दोन्ही देशांना बघायला मिळाले आहेत. त्या पार्श्वभुमीवर जगभरातील बदलत्या परिमाणांच्या आधारे परस्पर हितांच्या मुद्यांवर चर्चा केली जाईल, असे जयशंकर यांनी चर्चेपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले. रशियाबरोबरच्या आर्थिक सहकार्याच्या आंतरसरकारी आयोगाच्या बैठकीतील मुद्यांचाही आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
काल जयशंकर यांनी रशियाचे उपपंतप्रधान मॅन्टुरोव यांच्याशी द्विपक्षीयआर्थिक संबंधांबाबतही चर्चा केली. यावेळी भविष्यात तामिळनाडूमधील कुडानकुलम येथील औष्णिक उर्जा प्रकल्पामध्ये उर्जा उत्पादन प्रकल्पांमधील भागीदारी करारावर चर्चा झाली होती.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर पाश्चात्य देशांनी रशियाशी संबंध तोडून टाकले असतानाही भारताने रशियाबरोबरचे संबंध जपले होते.





