टर्निंग पॉईंटला मुलासोबत नसल्याची खंत; गजानन कीर्तिकरांची भावना

मुंबई – मुलाच्या टर्निंग पॉईंटला मी मुलासोबत नव्हतो, याची मला खंत आहे, असे मत खासदार तथा शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केले. त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असून त्यांच्याविरोधात रवींद्र वायकर हे मैदानात आहेत.
परंतु निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून गजानन कीर्तिकर यांनी रवींद्र वायकर यांचा प्रचार केला, तर दुसरीकडे आपल्या मुलाच्या विरोधातच प्रचार करण्याची त्यांच्यावर वेळ आली. यासंदर्भात त्यांनी खंत व्यक्त केली.
विशेष म्हणजे काल मतदानाच्या दिवशीच गजानन कीर्तिकरां पत्नी व अमोल कीर्तिकर यांच्या आई मेघना कीर्तिकर यांनी मी मुलाच्या बाजूनेच आहे, मुळ शिवसेनेसोबतच मी असून त्याच्यासाठी प्रचारात देखील उतरले आहे, अशी भावना व्यक्त केली होती.
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात केवळ ठाकरे विरुद्ध भाजपा असाच सामना नव्हता. तर, ठाकरे विरुद्ध, शिंदे आणि भाजपा असा सामना रंगला होता. त्यामुळे, ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली ही निवडणूक आहे. त्यातील, दोन मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाला.
यंदा केवळ शिवसेना कार्यकर्तेच एकमेकांविरद्ध मैदानात उतरले नव्हते. तर, कुटुंबातही दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. त्यातूनच, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघात लेक उमेदवार असताना बाप विरोधात प्रचार करत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, लेकासाठी प्रचार न केल्याची खंत अखेर वडिल खासदार गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केली.
मविआलाही चांगल्या जागा मिळतील
अमोल त्याची संघटना सोडून कुठेच जाणार नाही, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि मी वन टू वन भेटून देखील अमोलला सांगितले होते. पण, तो शिवसेनेत आमच्यासोबत आला नाही, असा गौप्यस्फोटही कीर्तीकरांनी केला.
तसेच, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी उमेदवार दिलेले आहेत, ते लढत आहेत. त्यानुसार महाविकास आघाडीला देखील महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळतील, असा दावाच कीर्तीकर यांनी केला आहे. कीर्तीकरांच्या या विधानामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावताना दिसून येतात.





