घराच्या कच्च्या मालाच्या किमती कमी करा – बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी

नवी दिल्ली – देशातील बांधकाम क्षेत्रासमोर सध्या अनेक प्रश्न आहेत. त्यात कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि कुशल मनुष्यबळाचा अभाव इत्यादीचा समावेश आहे, असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेचे अध्यक्ष निमेश पटेल यांनी सांगितले.
बांधकाम क्षेत्राला उद्योगाचा दर्जा द्यावा अशी मागणी या क्षेत्राने अनेक वेळा सरकारकडे केली आहे. मात्र ही मागणी अजूनही औपचारिकरित्या पूर्ण झाली नसल्याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केले.
या क्षेत्राला नियंत्रक असण्याची गरज आहे. मात्र अजूनही औपचारिक पातळीवर एकूणच रिऍल्टी क्षेत्रासाठी नियंत्रक नाही. रेराप्रमाणे सिमेंट नियंत्रण प्राधिकरण निर्माण करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. घरासाठीच्या कच्च्या मालाच्या दरात एकतर्फी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ योग्य आहे की नाही याची शहानिशा करण्याची गरज आहे. अनेकदा पोलाद आणि सिमेंट कंपन्यानी आवश्यकतेपेक्षा जास्त दर वाढविले असल्याचा आरोप करण्यात आलेले आहेत.





