आरक्षण सोडतीनंतर बदलली समीकरणे; खुल्या गटात जोरदार चुरस पुणे – प्रभाग आरक्षण सोडतीनंतर अनेक इच्छुकांची राजकीय समीकरणे बदलली आहेत. ५० टक्के महिला आरक्षणामुळे काही नगरसेवकांना घरातील महिलेला संधी द्यावी लागणार आहे; अथवा खुल्या जागेतून तिकीट मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. खुल्या गटात इच्छुक जास्त असल्याने तेथे उमेदवारीसाठी मोठी चुरस असणार आहे. अनेकांना एकाच प्रभागात घरात दोन तिकिटांची संधीही उपलब्ध झाली आहे. प्रामुख्याने अनूसुचित जाती आणि इतर मागासवर्ग महिलांच्या आरक्षणामुळे हे बदल होत आहेत. येथे बिघडली गणिते प्रभाग क्रमांक २ (फुलेनगर – नागपूर चाळ) मध्ये अनुसूचित जातीचे (महिला) आरक्षण पडले आहे. येथे ओबीसी महिला, ओबीसी सर्वसाधारण आणि एक खुला गट आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत अनुसूचित जाती (खुला) गटातून लढलेले माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांची अडचण झाली आहे. त्यांना खुल्या गटातून लढावे लागणार आहे; अन्यथा घरातील महिला उमेदवाराला संधी द्यावी लागणार आहे. प्रभाग ३ (विमाननगर- लोहगाव) मध्ये ओबीसी (खुला) ओबीसी (महिला) आणि खुला (महिला) ही तीन आरक्षण आहेत. त्यामुळे मागील निवडणुकीत एससीमधून लढलेले माजी नगरसेवक राहुल भंडारे यांना खुल्या गटातील तिकिटासाठी झगडावे लागणार आहे. या मतदारसंघाला लोहगाव, तसेच समाविष्ट गावांची हद्द जोडल्याने या भागात अनेक जण इच्छुक आहेत. प्रभाग ७ (गोखलेनगर- वाकडेवाडी) मध्ये अनुसूचित जाती (महिला), ओबीसी (महिला), दोन जागा सर्वसाधारणसाठी आहेत. मागील निवडणुकीत या प्रभागात एसटी (महिला) आरक्षण होते ते वगळल्याने आता माजी नगरसेविका राजश्री काळे यांना प्रभाग ९ मध्ये जावे लागणार आहे. माजी नगरसेवक आदित्य माळवे ओबीसी (पुरुष) मधून लढले होते. आता महिला (ओबीसी) असल्याने माळवे यांना खुल्या गटात तिकिटासाठी झगडावे लागेल, नाहीतर घरातील महिलेला उमेदवारी द्यावी लागेल. प्रभाग ८ (औंंध- बोपोडी) मध्ये एससी (खुला), ओबीसी (महिला) खुला (महिला) ही आरक्षणे पडली आहेत. या प्रभागातील माजी नगसेवक विजय शेवाळेंचे निधन झाले आहे. प्रकाश ढोरे खुल्या गटातून लढले होते. या प्रभागात आता भाजपकडून सनी निम्हण इच्छुक आहेत. पुरुषांसाठी खुल्या गटाची जागा एकच असल्याने या दोघांचीही कोंडी झाली आहे. प्रभाग ९ (सूस- बाणेर- पाषाण) मध्ये अनुसूचित जमाती महिला), ओबीसी (खुला) सर्वसाधारण महिला आणि खुला ही आरक्षणे आहेत. मागील निवडणुकीत माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि सायली सायकर या ओबीसीमधून निवडून आल्या होत्या. आता ओबीसी महिला जागाच नसल्याने त्यांंची कोंडी झाली आहे. एसटी (महिला) आरक्षण प्रभागात आल्याने माजी नगरसेविका राजश्री काळे इथून इच्छुक आहेत. याशिवाय सूस, म्हाळूंगेमधूनही इच्छूक असल्याने तिकिटांसाठी मारामारी असणार आहे. प्रभाग १२ (छत्रपती शिवाजीनगर- माॅडेल काॅलनी) मध्ये अनुसूचित जाती (महिला) ओबीसी (खुला), खुला (महिला) आणि सर्वसाधारणसाठी एक आरक्षण आहे. या प्रभागात माजी नगरसेविका अलका खाडे ओबीसी महिला जागेसाठी लढल्या होत्या. त्यामुळे त्यांना आता खुल्या गटातील जागेसाठी झगडावे लागणार आहे. प्रभात २१ (सॅलिसबरी पार्क, मुकुंदनगर) मध्ये अनुसूचित जाती, ओबीसी (महिला) खुला (महिला) आणि खुला गट आरक्षण आहे. या प्रभागातून भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले ओबीसी खुलामधून लढले होते. माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले सर्वसाधारण गटातून लढले होते. माजी नगरसेविका राजश्री शिळीमकर यांनी खुल्या गटातून निवडणूक लढविली होती. आता ओबीसी खुला आरक्षण नसल्याने भिमाले आणि चोरबेले यांना एकच जागा असणार आहे. शिळीमकर खुल्या गटातून लढण्यास इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत या ठिकाणी एससी महिला आरक्षण होते. आता ते खुले झाले आहे. त्यामुळे माजी नगरसेविका अनुसया चव्हाण यांचीही उमेदवारी बदणार आहे. प्रभाग २२ (काशेवाडी- डायस प्लाॅट) मध्ये अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण महिला, ओबीसी (खुला) आणि सर्वसाधारण ही आरक्षणे पडली आहेत. येथे गेल्या वेळी माजी नगरसेवक अविनाश बागवे अनुसूचित जाती (खुला) गटातून लढले होते. मात्र, ही जागा आता महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांना खुल्या गटातून तिकिटासाठी संघर्ष करावा लागेल. प्रभाग २४ (कसबा- केईएम- रास्ता पेठ) मध्ये मागील निवडणुकीत एससी ( महिला) आरक्षण होते. या वेळी ते इतर प्रभागात गेल्याने या प्रभागात माजी नगरसेविका पल्लवी जावळे यांची कोंडी झाली आहे. त्यांना तिकिटासाठी सर्वसाधारण महिला गटातून उमेदवारी मिळवावी लागेल. प्रभाग २७ (नवी पेठ – पर्वती) मध्ये अनुसूचित जाती (खुला),ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि खुल्या गटाचे आरक्षण आहे. या प्रभागातून गेल्या वेळी अनुसूचित जाती (महिला) गटातून माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे निवडून आल्या होत्या. त्यांना या वेळी खुल्या गटातून उमेदवारी मिळवावी लागणार आहे. ओबीसी महिलामध्ये दिवंगत नगरसेवक महेश लडकत यांच्या कुटुंबातील महिलेला भाजपकडून उमेदवारीची संधी मिळू शकते. प्रभाग क्रमांक ३२ (वारजे- पॉप्युलरनगर) मध्ये नव्याने अनुसूचित जाती महिला, ओबीसी सर्वसाधारण, महिला सर्वसाधारण व सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे या प्रभागातील सचिन दोडके, सायली वांजळे, दिलीप बराटे अथवा दीपाली धुमाळ यांच्यापैकी कोणाला तरी अन्य प्रभागातून लढावे लागणार आहे. प्रभाग ३७ ( धनकवडी- कात्रज डेअरी) मध्ये ओबीसी खुला, खुला महिला, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण पडल्याने माजी नगरसेवक बाळा धनकवडे, अश्विनी भागवत यांना खुल्या गटातून लढावे लागणार आहे. प्रभाग क्रमांक ३८ (बालाजीनगर- आंबेगाव – कात्रज) या पाच सदस्यांच्या प्रभागात तीन जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे दोन जागांसाठी माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक युवराज बेलदरे , शिवसेना नेते वसंत मोरे, माजी नगरसेवक प्रकाश कदम यांना आमनेसामने लढावे लागणार आहे; अथवा घरातील महिलांना संधी द्यावी लागणार आहे.