पुसेगाव – नेर ता. खटाव जि. सातारा येथील फिरोज नुरमोहमद शिकलगार यांचे संपूर्ण घर शॉर्ट सर्किटमुळे जळाले आहे. शनिवारी २७ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. जीवनावश्यक व इतर सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडल्याने हे कुटुंब मोठ्या संकटात सापडले आहे. सुदैवाने सदरची घटना दिवसा घडल्याने व सर्वजण कामानिमित्त बाहेर असल्याने जीवितहानी झाली नाही. सदर प्रशासनाच्या वतीने कुटुंबास मदत व्हावी अशी मागणी फिरोज शिकलगार व शाहरुख शिकलगार यांनी केली आहे. रविवारी एक वाजता प्रशासनाच्या वतीने आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या कुटुंबाचा नेर तलाठी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा केला यामध्ये दहा लाखाच्या वर नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान पुसेगाव पोलीस स्टेशनचे सपोनी संदीप पोमन यांनी भेट देऊन या जळीतग्रस्त घराची पाहणी केली. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे घराला आग लागली, आग एवढ्या मोठ्या स्वरूपात होती, या आगीत जीवनावश्यक व इतर सर्व साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाले आहे. नेर येथील तरुणांनी व ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तसेच या ठिकाणी अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले. अग्निशमन व ग्रामस्थांच्या वतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तोपर्यंत सर्वच जळून नष्ट झाले होते. या आगीच्या भक्षस्थानी झालेल्या कुटुंबाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सढळ हाताने मदत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असून, खालील फोन पे नंबरवर आपण आपली मदत पाठवू शकता असे आवाहनही या कुटुंबाच्या वतीने करण्यात आले आहे. ७३८५५६२८४८ फिरोज शिकलगार/९६६५७६९२१३ शाहरुख शिकलगार (नेर ता.खटाव जि. सातारा) नेर येथील ग्रामस्थांनी तसेच दानशूर व्यक्तीनि आर्थिक स्वरूपात खारीच्या वाट्याने का होईना मदत केल्याचे या अपघाती जळीत ग्रस्त कुटुंबाने सांगितले. प्रशासनाच्या वतीने मदत मिळेल त्यावेळी मिळेल परंतु सध्या तरी अशा संकटकाळी मदतीचा हात देण्याची गरज आहे.