‘या’ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट ! शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर

Palghar News | राज्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला आहे. मुंबई, पालघर, भिवंडी पुण्यासह काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. यातच हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सोमवार, दिनांक ७ रोजी पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये जारी केलेल्या आदेशानुसार, हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात सोमवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, खाजगी आणि अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
परंतु, शाळा आणि महाविद्यालयांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.
तर दहावीच्या पुरवणी परीक्षेचा भूगोल विषयाचा पेपर ७ ऑगस्ट रोजी पालघर तसेच इतर सर्व जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर वेळापत्रकानुसार होणार आहे. मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी ही माहिती दिली.
मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज
याशिवाय मुंबईतही हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला असला आहे. मात्र अद्याप शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. आवश्यकता भासल्यास त्या त्या परिसरातील शाळांना तशी सवलत दिली जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी दिली.
हेही वाचा:





