Himachal : हिमाचलमध्ये पावसाचा प्रकोप सुरुच; तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट !

शिमला – हिमाचल प्रदेशात दोन आठवड्यापासून पावसाचा प्रकोप सुरूच आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. त्यातच हवामान खात्याने मंडी, कांगडा, सिरमौर या तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, पुरामुळे झालेल्या मोठ्या विध्वंसातून हिमाचल प्रदेश अद्याप सावरू शकलेले नाही.
हिमाचलमध्ये मान्सूनमुळे आतापर्यंत 74 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 47 जण ढगफुटी, अचानक पूर आणि भूस्खलन यासारख्या पावसाशी संबंधित घटनांशी संबंधित आहेत. याशिवाय 115 जण जखमी झाले आहेत. राज्यात मुसळधार पावसामुळे पुल वाहून गेल्याने आणि पुरामुळे 261 रस्ते बंद आहेत. यात 521 प्राणी आणि पक्षी वाहून गेले असून 19 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी राज्यात 700 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. मंडीमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असून येथील 15 जणांचा मृत्यू झाला आहे, अनेक लोकांचा शोध सुरू आहे. मंडीमध्ये 176 रस्ते बंद आहेत. कुल्लूमध्ये 39, सिरमौरमध्ये 19, कांगडामध्ये 120 आणि शिमलामध्ये 6 रस्ते बंद आहेत.
मंडीच्या सेराजमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी सैन्याला मैदानात उतरावे लागले. दरम्यान, हवामान खात्याने 8 जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच सरकारी प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.





