मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यात अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

भंडारा : विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून उद्या (25 जुलै) भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या आणि खासगी कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर केली आहे. भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते आणि चंद्रपूरचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी हे आदेश जारी केले आहेत.
भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जलमग्न परिस्थिती आणि अचानक पूर येण्याची शक्यता आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातही तीव्र पावसामुळे प्रशासन सतर्क आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आणि अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, अहेरी उपविभागातील आल्लापल्ली परिसरात पाणी साचल्याने 17 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. नद्या, नाले आणि तलाव तुडुंब भरले असून, पावसाचा जोर कायम आहे. गडचिरोलीत उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील काही भागांत पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असला, तरी काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भात पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहील. प्रशासनाने एनडीआरएफ पथकांना तैनात केले असून, नागरिकांना हवामान अंदाज आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.





