Gadchiroli News : गडचिरोली जिल्हा अजूनही नक्षलग्रस्त; गृहविभागाने केली मोठी घोषणा

मुंबई : मार्च 2026 पूर्वी देश नक्षलमुक्त करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्यातील नक्षलग्रस्त भागात राज्य सरकारकडून प्रभावी कारवाया केल्या जात असून आता गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, सालेकसा, देवरी व अर्जुनी मोरगाव हे चार तालुकेच नक्षलप्रभावीत असल्याची असल्याची घोषणा गृहविभागाने केली आहे. दरम्यान, गडचिरोली नक्षलमुक्त झाल्याचा पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच महिन्यांपूर्वी केलेला दावा फोल ठरला आहे.
राज्यात गेल्या २० वर्षांपासून नक्षलवादाविरोधात सरकार लढत असून गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात नक्षवाद्यांचा प्रभाव होता. मात्र गेल्या काही वर्षात सुरक्षा यंत्रणांनी प्रभावी मोहीम राबवत नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातून नलक्षवाद्यांना हद्दपार केले असून गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातूनही येत्या काही महिन्यात नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा सरकारचा निर्धार आहे.
सरकारने पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा फेरआढावा घेत पुन्हा एकदा नव्याने नक्षलग्रस्त भागाची घोषणा केली आहे. त्यानुसार संपूर्ण गडचिरोली जिल्हा नक्षलप्रभावीत जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, सालेकसा, देवरी व अर्जुनी मोरगाव हे चार तालुकेही नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. राज्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक लाभाच्या सवलती दिल्या जातात. आता या सवलती नव्याने जाहिर करण्यात आलेल्या नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहेत.





