चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात एका धक्कादायक घटनेत मुलाने वडिलांची निर्घृण हत्या केली. बरडकिन्ही गावातील नामदेव लक्ष्मण गडे (६५) हे शेजारच्या शेतात वाटाण्याच्या शेंगा तोडत असताना त्यांचा मुलगा होमराज गडे (३२) याला हे समजले. या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या होमराजने प्रथम शेतातच वडिलांना मारहाण केली.
जखमी अवस्थेत घरी पोहोचलेल्या नामदेव यांना होमराजने पुन्हा लोखंडी शस्त्र आणि काठीने बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने रक्ताने माखलेले कपडे आणि काठी चुलीत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने पोलीस पाटलांकडे जाऊन वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली.
घटनास्थळावरील संशयास्पद परिस्थिती पाहून पोलीस पाटलांनी ब्रह्मपुरी पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक प्रमोद बांनबले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. चौकशीदरम्यान होमराजने गुन्ह्याची कबुली दिली, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.