आरोग्य विभागात 600 पदांची भरती

पुणे – शहरात करोना बाधित वाढत आहेत. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरणातील संशयितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता आरोग्य विभागातील तब्बल 600 पदे सहा महिन्यांसाठी भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यात डॉक्टर्स, आयसीयू तज्ज्ञ तसेच इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी सुमारे वर्ग- 1 ते 4 ची सुमारे 1,689 पदे मंजूर आहेत. त्यातील सुमारे 745 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी राज्य शासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर मंजुरी दिली आहे. त्यासाठी पालिकेने भरती प्रक्रियाही राबवली होती.
मात्र, आधी कायमस्वरुपी पदांची जाहिरात देऊन नंतर प्रत्यक्षात ही पदे 3 महिन्यांसाठी भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पालिकेस अवघे 18 डॉक्टर्स मिळाले होते. त्यामुळे आरोग्य विभागाने पुन्हा नव्याने जाहिरात काढत आता ही पदे सहा महिन्यांसाठी भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मासिक वेतनही वाढीव स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात, आयसीयूशी संबधित तब्बल 50 पदे असून त्यांना मासिक 2 लाख 25 हजारांचे वेतन असेल. तर तर एमबीबीएससाठी मासिक 60 हजार आणि बीएसएमएससाठी 40 हजार मासिक वेतन निश्चित करण्यात आले आहे.
चार हजार बेड वाढविणार
शहरात दररोज मोठ्या प्रमाणात नवीन करोनाबाधित आढळत आहेत. त्यावर आता महापालिका प्रशासन सुमारे 4 हजार बेड्सची क्षमता असलेली 5 कोविड केअर सेंटर उभारत आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक कर्मचारी आरोग्य विभागाकडे नाहीत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.



