पुण्यातील देहू ग्रामपंचायतीत ऐन आचारसंहितेमध्ये नोकर भरती?

पुणे – विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असताना देहू ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि प्रशासक यांनी नोकर भरती सुरू केली आहे. याबाबत त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या प्रकरणी हवेली गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने दिले आहेत.
सध्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. असे असताना देहू ग्रामपंचायतीने कर्मचारी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून आचारसंहिता काळात प्रत्यक्ष भरती प्रक्रिया घोषित केली आहे.
यासाठी गटविकास अधिकारी किंवा जिल्हा परिषदेची परवानगी घेतलेली नाही. जाहिरातींमध्ये ग्रामसेवकांच्या बरोबरीने प्रशासकाचे नावदेखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. याबाबत तक्रारीदेखील आल्या आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.





