India-China Border Dispute: सीमा-विवादावर तोडगा काढण्यासाठी आम्ही तयार…! चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठं विधान….

India-China Border Dispute : भारत आणि चीन यांच्यात दीर्घकाळ चालू असलेल्या तणावादरम्यान चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील जमिनीच्या परिस्थितीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याबाबत विधान केले आहे. यासोबतच अजित डोवाल यांची भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारत-चीन सीमा प्रश्नासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून पुन्हा नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन देखील केले आहे.
वांग यी म्हणाले, चीन आणि भारत यांच्यातील संबंध द्विपक्षीय सीमांच्या पलीकडे जाऊन जागतिक महत्त्व वाढवतात.चीनचे परराष्ट्र मंत्री असण्याव्यतिरिक्त, वांग यी हे भारत-चीन सीमा संवाद यंत्रणेच्या चीनच्या बाजूचे विशेष प्रतिनिधी देखील आहेत. याशिवाय वांग यी हे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटिकल ब्युरोचे सदस्यही आहेत.
अजित डोवाल यांचे अभिनंदन करताना वांग यांनी म्हटले आहे की, ‘जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले चीन आणि भारत हे दोन्ही देश जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहेत. चीन आणि भारत यांच्यातील संबंध द्विपक्षीय सीमांच्या पलीकडे जातात आणि त्यांना जागतिक महत्त्व देखील आहे.
वांग यी आणि एस जयशंकर यांची कझाकिस्तानमध्ये झाली होती भेट
चीनचे सरकारी वृत्त शिन्हुआनुसार,दोन्ही देशांनी केलेल्या महत्त्वपूर्ण करारांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि सीमावर्ती भागातील जमिनीशी संबंधित समस्या योग्यरित्या हाताळण्यासाठी अजित डोवाल यांच्याशी हातमिळवणी करण्यास तयार असल्याचे वांग यांनी सांगितले. जेणेकरून सीमावर्ती भागात शांतता आणि सलोखा राखता येईल.वांग यी यांनी अलीकडेच कझाकस्तानमधील अस्ताना येथे झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी असे वक्तव्य केले.नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच चीन आणि भारताच्या प्रमुख नेत्यांची कझाकिस्तानमध्ये भेट झाली होती.
सीमावादासाठी द्विपक्षीय यंत्रणा…
वास्तविक, भारत आणि चीनमध्ये 3 हजार 488 किमी लांबीची विवादित सीमा आहे. 2003 मध्ये सीमा विवादांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक विशेष प्रतिनिधी यंत्रणा तयार करण्यात आली. भारताकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि चीनच्या बाजूने परराष्ट्र मंत्री याचे नेतृत्व करतात.गेल्या वर्षांत या यंत्रणेच्या 19 बैठका झाल्या आहेत, विश्लेषकांचे मत आहे की, ही एक अतिशय उपयुक्त आणि आशादायक द्विपक्षीय यंत्रणा आहे.मात्र, चीनसोबतचा सीमावाद अद्यापही संपलेला नाही. 5 मे 2020 रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध खालच्या स्तरावर पोहोचले आहेत.
Earthquake In Phillipines : फिलिपाइन्स हादरलं..! 7.1 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा…
तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड…
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने निवृत्ती पोलीस अधिकारी अजित डोवाल यांची 10 जून 2024 पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत किंवा सध्याचे पंतप्रधान पदावर असेपर्यंत डोवाल हे या पदावर असतील. ते तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. डोवाल यांच्याशिवाय पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरही पुन्हा एकदा पी.के.मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





