Congress MPs Suspended : कागदपत्रे फाडून अध्यक्षांच्या दिशेने फेकणे आणि सतत गोंधळ घालणे अशा ‘अशिस्त वर्तन’ाच्या आरोपांवरून मंगळवारी लोकसभेतून काँग्रेसचे आठ खासदार निलंबित करण्यात आले. अनेकदा कामकाज तहकूब झाल्यानंतर दुपारी ३ वाजता सभागृह पुन्हा सुरू होताच अध्यक्षस्थानी असलेल्या दिलीप सैकिया यांनी संबंधित सदस्यांची नावे घेतली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी, म्हणजे २ एप्रिलपर्यंत, या सदस्यांच्या निलंबनाचा ठराव मांडला, जो सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर केला. त्यानंतर वाढत्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या निलंबनाविरोधात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी संसद भवनाबाहेर निदर्शने केली. २०२० च्या भारत-चीन संघर्षावर आधारित लेख वाचण्यास परवानगी नाकारल्यामुळे हा गोंधळ उफाळून आला. कोण कोण झालं निलंबित? स्पीकर यांनी संसदीय नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मणिकम टॅगोर, गुरजीत औजला, राजा वडिंग, हिबी ईडन, किरण रेड्डी, प्रशांत पोडोले, व्यंकट रमण आणि डीन कुरियोकोज यांना उर्वरित अर्थसंल्पीय अधिवेशनातून निलंबित केलं. मात्र हा प्रस्ताव पास झाल्यानंतरही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कागद भिरकावणे सुरूच ठेवले.