Top 15 News: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता Truecallerची गरज संपणार? आणि अशोक सराफ यांच्यामुळे स्वामी भक्तीला सुरुवात, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे वितरण सुरू झाले आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
दुष्काळग्रस्तांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात
Top 15 News: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे वितरण सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा केले जात आहेत. राज्यातील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. यासाठी सरकारकडून ७ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी मदत वितरण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे.
बंगालच्या उपसागरात नवे चक्रीवादळ घोंघावणार;
विदर्भासह राज्यातील काही भागांना पावसाचा इशारा
राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाच बंगालच्या उपसागरात नव्या चक्रीवादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात लातूर, धाराशिव, तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथेही पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगरमध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे. मात्र, सोलापूरसह काही जिल्ह्यांत हवामान कोरडे राहणार असून शेतकऱ्यांची परतीच्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
बाळासाहेब राऊतांना शिव्या द्यायचे;
राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा
संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत घेतली, तेव्हा सुरुवातीला बाळासाहेब त्यांच्यावर नाराज होते. मुलाखतीतील रोखठोक प्रश्न आणि दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या मजकुरामुळे मात्र बाळासाहेब प्रभावित झाले. ‘इस बंदे में दम है’, असे म्हणत त्यांनी राऊतांचे कौतुक केले. पुढे त्यांची सामना संपादकपदी नियुक्ती झाली, असा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला. या सोहळ्यात उद्धव आणि राज ठाकरे एकाच मंचावर आल्याने राजकीय चर्चांनाही उधाण आले.
‘गाव विकणे आहे’ म्हणणाऱ्या तुळशी गावात शरद पवार जाणार;
दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार
राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दुष्काळ पाहणी दौऱ्यावर निघाले आहेत. उद्या ते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गावाला भेट देणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता ग्रामस्थांशी संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पाणीटंचाई, शेतीचे नुकसान आणि चारा प्रश्नामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी सप्टेंबरमध्ये ‘गाव विकणे आहे’ असे फलक लावून आंदोलन केले होते. या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. आता शरद पवारांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेक लाडकी योजनेत मोठा बदल!
आता घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार
राज्य सरकारने लेक लाडकी योजनेच्या अर्ज प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली. आता लाभार्थ्यांना महाडीबीटी २.० पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यापूर्वी अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज सादर करावा लागत होता. नव्या प्रक्रियेत कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली असून अर्ज नोंदणी, छाननी, मंजुरी आणि अर्जाची स्थिती तपासण्याची सुविधाही ऑनलाइन करण्यात आली आहे. आतापर्यंत २ लाख ९८ हजार ६९५ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे.
६,२३३ भाविकांची गोदा आरती;
नाशिकचा दुसरा विश्वविक्रम! Top 15 News:
नाशिकच्या रामतीर्थ परिसरात ६ हजार २३३ भाविकांनी एकत्रित गोदा आरती करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली. सिंहस्थ महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, आठवडाभरात नाशिकने दुसरा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी २५ ऑक्टोबर रोजी याच ठिकाणी ५१७ शंखवादकांनी एकाच वेळी शंखनाद करून विश्वविक्रम नोंदवला होता. गोदा आरतीच्या उपक्रमात सात तालुक्यांतील ६५० गावांमधील आदिवासी बांधवांसह हजारो भाविक सहभागी झाले. या विक्रमामुळे नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली.
ऊसदरावरून राजू शेट्टी आक्रमक;
३ नोव्हेंबरपासून महामार्ग रोको!
ऊसदराच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना इशारा दिला आहे. ३५०० ते ३६०० रुपये दर देऊन कारखानदार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू असूनही कारखानदार शेतकऱ्यांना योग्य दर देत नसल्याचे शेट्टी म्हणाले. याविरोधात ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पुणे-बंगळुरू महामार्गावरील किणी टोलनाक्यावर बेमुदत महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.
जून २०२७ पर्यंत पाण्याचे नियोजन;
बावनकुळेंची आढावा बैठक
नागपूर शहर आणि जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. जून २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी पाणीकपात, नासाडी रोखणे, टँकरची व्यवस्था आणि विहिरींची दुरुस्ती करण्याचे नियोजन आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचीही व्यवस्था केली जाणार आहे. पुढे ढकलता येणारी बांधकामे थांबवून पाणी व्यवस्थापन आणि शेतरस्त्यांच्या कामांवर खर्च करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
भाजपची ‘देश बचाव, अराजकता हटाव’ रॅली;
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची उपस्थिती
नांदेडमध्ये भाजपच्या वतीने ‘देश बचाव, अराजकता हटाव’ रॅली काढण्यात आली. राज कॉर्नर येथून सुरू झालेली रॅली भाजपच्या महानगर कार्यालयापर्यंत पोहोचली. या रॅलीत खासदार अजित गोडसे, आमदार तुषार राठोड, आमदार अमरनाथ राजुरकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विरोधक सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. रॅलीनंतर भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.
‘बच्चू कडूंनी प्रत्येकाची लायकी काढण्याचा ठेका घेतलाय का?’;
आमदार प्रवीण तायडेंचा सवाल
महायुतीतील युतीधर्मावरून सुरू झालेला वाद आता चिघळला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बण यांनी शिवसेना युतीधर्म पाळत नसल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना आमदार बच्चू कडू यांनी बण यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केली. यानंतर अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंना प्रत्युत्तर दिले. ‘बच्चू कडूंनी प्रत्येकाची लायकी काढण्याचा ठेका घेतला आहे काय?’ असा संतप्त सवाल तायडे यांनी उपस्थित केला. त्यामुळे महायुतीतील नेत्यांमधील शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
दिवाळीपूर्वी महागाईचा झटका!
व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला Top 15 News:
नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. १९ किलोच्या सिलिंडरचे दर दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यासह अनेक शहरांत १० रुपयांनी, तर चेन्नईत ११.५० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे मुंबईत व्यावसायिक सिलिंडरसाठी आता २,७७४.५० रुपये मोजावे लागणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळींचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. परिणामी फराळासह खाद्यपदार्थांच्या किमती वाढू शकतात. मात्र, घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आता Truecallerची गरज संपणार?
अनोळखी कॉलवर दिसणार कॉलरचे खरे नाव!
१ नोव्हेंबरपासून अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास स्क्रीनवर कॉल करणाऱ्याचे नाव दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे नाव सिमकार्ड खरेदी करताना केवायसीमध्ये नोंदवलेल्या माहितीवर आधारित असेल. यासाठी कोणतेही स्वतंत्र ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. ही सुविधा सुरुवातीला ४जी आणि त्यापुढील नेटवर्कवर उपलब्ध होणार आहे. २जी, ३जी आणि लँडलाइनसाठी नंतर निर्णय घेतला जाईल. व्यावसायिक क्रमांकांसाठी पडताळणीनंतर ब्रँडचे नाव दाखवता येईल. या सुविधेमुळे बनावट कॉल ओळखण्यास आणि फसवणूक टाळण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
इस्रायलमध्ये पंतप्रधान निवडीची पद्धत बदलणार?
नेतान्याहूंच्या विरोधकांची नवी खेळी!
इस्रायलमध्ये सरकार स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी पंतप्रधानांची थेट निवड करण्याची जुनी पद्धत पुन्हा आणण्यावर विरोधी पक्ष विचार करत आहेत. २७ ऑक्टोबरच्या निवडणुकीत नेतान्याहू समर्थकांना ५३, तर विरोधी आघाडीला ४८ जागा मिळाल्या. अरब पक्षांनी १९ जागा जिंकल्या. मात्र, सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेले ६१ जागांचे बहुमत कोणत्याही गटाकडे नाही. त्यामुळे विरोधक स्वतंत्र पंतप्रधान निवडणुकीचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत. यासाठी मूलभूत कायद्यात दुरुस्ती करावी लागणार असून किमान ६१ खासदारांचे समर्थन आवश्यक आहे. अद्याप या प्रस्तावावर अंतिम निर्णय झालेला नाही.
भारत-न्यूझीलंड पाचवा टी-20 आज
प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल ?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पाचवा आणि अखेरचा टी-20 सामना आज हॅमिल्टनमध्ये रंगणार आहे. भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली असून ४-१ ने मालिका संपवण्याचे लक्ष्य आहे. चौथ्या सामन्यात भारताला ८७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी संघात बदल होण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशी, नितीश रेड्डीच्या जागी शिवम दुबे, तर प्रिन्स यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी मिळू शकते. सामना दुपारी १२.३० वाजता सुरू होणार आहे.
अशोक सराफ यांच्यामुळे स्वामी भक्तीला सुरुवात;
निवेदिता सराफ यांनी सांगितला भावूक अनुभव! Top 15 News:
ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या स्वामी समर्थांच्या अर्धनारीश्वर रूपातील फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, एका मुलाखतीत त्यांनी आपल्या स्वामी भक्तीचा प्रवास उलगडला. ‘माझे पती अशोक सराफ यांच्यामुळे मी स्वामी समर्थांची भक्ती करू लागले’, असा खुलासा त्यांनी केला. अशोक सराफ यांनी सहा वर्षे मांसाहार सोडून स्वामींची भक्ती केली होती. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन निवेदिता यांनीही स्वामींचा ग्रंथ वाचला आणि अक्कलकोटला भेट दिली. समाधी मठात गेल्यानंतर ‘मी घरी आले आहे’, अशी भावना मनात निर्माण झाल्याचे सांगताना त्या भावूक झाल्या.





