Devendra Fadnavis : ‘लाल संविधान हा केवळ मुखवटा’; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार घणाघात
Devendra Fadnavis : ‘तुम्ही संविधान चोर आहात,’ अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

Devendra Fadnavis criticizes Rahul Gandhi : ठाण्यात आयोजित लोकतंत्र बचाव यात्रेच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसकडून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच व्होटचोरीचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या काँग्रेसनेच संविधानाची चोरी केल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. ‘तुम्ही संविधान चोर आहात,’ अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
यावेळी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना फडणवीस यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला. इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच राहुल गांधीदेखील नागरिकांचे मूलभूत अधिकार संपवण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. विरोधक मोर्चे काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संस्थांना बदनाम करत असल्याचेही ते म्हणाले.
‘दारू तीच आहे, फक्त बाटली बदलली’; राहुल गांधींवर टीका
राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिकेवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इंदिरा गांधींचा नातू आता पुन्हा तेच घेऊन रस्त्यावर उतरला आहे. दारू तीच आहे, फक्त बाटली बदलली आहे. दारू तीच आहे, आता नीती बदलली आहे.”
पुढे त्यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरही प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी वारंवार व्हिएतनाम आणि थायलंडला का जातात, असा सवाल त्यांनी केला. तसेच चीनकडून काँग्रेस आणि त्यांच्या ट्रस्टला देणग्या का मिळत आहेत, असा प्रश्न उपस्थित करत या आर्थिक व्यवहारांबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.
फडणवीस म्हणाले की, “भारताच्या सुरक्षेला आव्हान देणारा देश चीन असताना काँग्रेस आणि त्यांच्या ट्रस्टला चीनकडून देणग्या का मिळतात? चीनच्या पैशांच्या माध्यमातून भारतात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
‘लाल संविधान हा केवळ मास्क’; फडणवीसांचा आरोप
देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या हातातील लाल संविधानाच्या पुस्तकावरूनही टीका केली. देशात अराजकता निर्माण करण्यामागे एक विशिष्ट विचारधारा असल्याचा दावा त्यांनी केला.
“अराजकता निर्माण करण्याचं एक कारण आहे. एक नवीन लाल पुस्तक आहे. लाल संविधान हा केवळ मास्क आहे, मुखवटा आहे. या लाल पुस्तकाचा वापर करून षडयंत्र रचलं जात आहे. याच लाल पुस्तकाचा वापर करून नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशचं संविधान बदललं आहे. हीच त्यांची इथली नीती आहे.”
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “एका बाजूला हातात लाल संविधान ठेवता आणि दुसऱ्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांना बदनाम करता. हा विरोधाभास आहे.”





