RCB vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा मोठा धमाका! आरसीबीच्या विजयरथाला ब्रेक लावत गुणतालिकेत घेतली मोठी झेप
RCB vs DC : दिल्ली कॅपिटल्सने आपला विजयाचा धडाका कायम राखत आरसीबीचा विजयरथ रोखला आहे.

RCB vs DC Highlights : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने आपला विजयाचा धडाका कायम राखत आरसीबीचा विजयरथ रोखला आहे. सलग पाच सामने जिंकणाऱ्या आरसीबीला या मोसमात पराभूत करणारा दिल्ली हा पहिला संघ ठरला आहे. या विजयासोबतच दिल्लीने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेत प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःला भक्कम केले आहे.
आरसीबीची फलंदाजी सपशेल फ्लॉप –
वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र तो चुकीचा ठरला. कर्णधार स्मृती मानधनाने सर्वाधिक ३८ धावा केल्या, पण तिला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. दिल्लीच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर आरसीबीचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आणि त्यांना २० षटकांत केवळ १०९ धावाच करता आल्या. स्नेह राणासह दिल्लीच्या सर्वच गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत आरसीबीला जखडून ठेवले.
Roaring into the Top 2⃣ 💙@DelhiCapitals with a dominant 7⃣-wicket win in Vadodara to jump to 2nd spot on the points table 👏
Scorecard ▶️ https://t.co/LX37VtsnbS #TATAWPL | #KhelEmotionKa | #RCBvDC pic.twitter.com/vSKMsOAqdk
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 24, 2026
लॉरा वुल्वार्टची झुंजार खेळी –
प्रत्युत्तरात ११० धावांचे माफक लक्ष्य गाठताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. लॉरा वुल्वार्टने ४२ धावांची नाबाद खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. तिला कर्णधार जेमिमा रॉड्रिग्ज (२४ धावा) आणि मॅरिझॅन कॅप (नाबाद १९ धावा) यांनी मोलाची साथ दिली. दिल्लीने २६ चेंडू आणि ७ गडी राखून हे लक्ष्य गाठले आणि स्पर्धेतील आपला तिसरा विजय नोंदवला.
मॅरिझॅन कॅप सामनावीर ठरली
गुणतालिकेत दिल्लीची दुसऱ्या स्थानावर झेप –
या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत चौथ्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आरसीबीने आधीच प्लेऑफसाठी पात्रता सिद्ध केली आहे, मात्र आता उरलेल्या दोन जागांसाठी दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.





