Yash Dayal : यश दयालला मोठा धक्का! ‘या’ लीगमध्ये खेळण्यावर घातली बंदी, काय आहे कारण? जाणून घ्या

यश दयालवर घातली बंदी-
प्रकाशित अहवालांनुसार, यश दयालला यूपी टी-20 लीगमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने (UPCA) हा निर्णय घेतला आहे. जयपूरच्या सांगानेर सदर पोलीस ठाण्यात यश दयालविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यूपी टी-20 लीगमधील गोरखपूर लायन्स या संघाने यश दयालला 7 लाख रुपयांना खरेदी केले होते. मात्र, आता तो या लीगमध्ये खेळू शकणार नाही. याशिवाय, यश दयालला राजस्थान उच्च न्यायालयाकडूनही मोठा धक्का बसला आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही –
बलात्कार प्रकरणात यश दयालला राजस्थान उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने त्याच्या अटकेला आणि पोलिसांच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. या प्रकरणात अल्पवयीन मुलीचा समावेश असल्याने स्थगिती देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होणार आहे.
दोन्ही प्रकरणांची पार्श्वभूमी –
यश दयालविरुद्ध पहिला गुन्हा गाझियाबादमध्ये दाखल झाला होता. त्यात त्याने गाझियाबादच्या एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात इलाहाबाद उच्च न्यायालयाने यश दयालच्या अटकेला स्थगिती दिली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीला जयपूरमध्ये त्याच्याविरुद्ध आणखी एक खटला दाखल झाला. यावेळी राजस्थान उच्च न्यायालयाने अटकेस स्थगिती देण्यास नकार दिला. यश दयालच्या या प्रकरणांमुळे त्याचे क्रिकेट करिअर आणि प्रतिमा यांना मोठा धक्का बसला आहे. पुढील सुनावणी आणि तपासातून या प्रकरणाचा खुलासा होईल, अशी अपेक्षा आहे.





