Satara: ‘एआय’च्या युगातही बहरतोय ‘रयत’चा वटवृक्ष, डॉ. भूषण केळकर; कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात
Satara रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 139 वा जयंती सोहळा सातारा येथे मंगळवारी उत्साहात झाला.

Satara: कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करा, पण त्यावर अवलंबून राहू नका. शिक्षण क्षेत्रात एआयचा वापर होईल; परंतु हे तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाही. तंत्रज्ञान विद्यार्थ्यांवर मानवी भावभावनांचे संस्कार करू शकणार नाही. कर्मवीरअण्णांनी उभारलेल्या या संस्थेचा वटवृक्ष एआयच्या युगातही बहरत आहे, असे मत आंतरराष्ट्रीय एआय तज्ज्ञ डॉ.भूषण केळकर यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 139 वा जयंती सोहळा सातारा येथे मंगळवारी उत्साहात झाला. त्यावेळी डॉ. केळकर बोलत होते. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष डॉ. एम. बी. शेख, व्हाइस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलाधिकारी खा. सुप्रिया सुळे, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सहसचिव (उच्च शिक्षण) प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव (माध्यमिक) बी. एन. पवार, सहसचिव (ऑडिट) प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, कर्मवीरांचे कुटुंबीय, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य शहाजी डोंगरे, प्रदीप हिवरकर, डॉ. धनंजय नलवडे, जनरल बॉडी सदस्य, आजीव सभासद, आजीव सेवक, शाखाप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
डॉ. केळकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीची माहिती देताना, मानवी जीवनावर होणारे परिणाम विशद केले. या तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण क्षेत्रात कसा असावा, याचा ऊहापोह केला. चंद्रकांत दळवी यांनी रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा, संस्थेच्या सर्व शाखांमधील इंटरऍक्टिव्ह पॅनेल, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण, ईआरपी स्वॉफ्टवेअर, माजी विद्यार्थी संघटना, रयत स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी, संशोधन आणि विकासाच्या धोरणांची माहिती दिली. स्पर्धा परीक्षेतून वर्ग 1 पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संस्थेचे सचिव किशोर राजेनिंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार वितरणाचे निवेदन डॉ. मेनकुदळे यांनी केले. बी. एन. पवार यांनी आभार मानले. डॉ. सविता मेनकुदळे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. दरम्यान, कर्मवीरांच्या चित्ररथाची सकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले), डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, लहुजी वस्ताद, अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पदाधिकार्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.





