Satara: जबरेश्वर मंदिर परिसरात ध्वनिवर्धक यंत्रणेला बंदी
Satara भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६ अन्वये हा प्रतिबंधात्मक आदेश दि. २० ते २६ सप्टेंबर या कालावधीत जारी केला आहे. या आदेशानुसार श्री जबरेश्वर मंदिराच्या आसपासचा परिसर, गजानन चौकातील मोदी बिल्डिंग ते टोपी चौक या रस्त्यावर गणेशोत्सव मिरवणुकीवेळी कोणतीही ध्वनिवर्धक यंत्रणा वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे.

Satara: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या श्री जबरेश्वर मंदिराच्या पुरातन वास्तू शिल्पांचे संरक्षण करण्यासाठी मंदिराच्या २०० मीटर परिसरात गणेशोत्सव मिरवणुकीवेळी ध्वनिवर्धक यंत्रणा वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचा आदेश प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनी जारी केला.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६ अन्वये हा प्रतिबंधात्मक आदेश दि. २० ते २६ सप्टेंबर या कालावधीत जारी केला आहे. या आदेशानुसार श्री जबरेश्वर मंदिराच्या आसपासचा परिसर, गजानन चौकातील मोदी बिल्डिंग ते टोपी चौक या रस्त्यावर गणेशोत्सव मिरवणुकीवेळी कोणतीही ध्वनिवर्धक यंत्रणा वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, कोल्हापूर उप- मंडळाच्या संरक्षक सहाय्यकांनी दि. १२ सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्रात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात ध्वनिवर्धकांचा वापर होत असल्याने पुरातन वास्तूवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली होती. मंदिर परिसरातून मिरवणूक जाताना ध्वनीची पातळी नियमांनुसार ठेवावी अथवा मिरवणुकीचा मार्ग बदलावा, अशी सूचना करण्यात आली होती.
त्यानंतर फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी दि. १४ सप्टेंबर रोजी प्रांताधिकारी कार्यालयास पत्र देऊन श्री जबरेश्वर मंदिराची संभाव्य हानी टाळण्यासाठी मंदिर परिसरात स्पीकर यंत्रणा न वाजविणे, पारंपरिक वाद्यांचा आवाज कमी ठेवणे तसेच या रस्त्यावर मिरवणूक थांबवू नये, अशी विनंती केली होती. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी गणेश मंडळे, मिरवणूक आयोजक आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





