पुणे : पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या ३.५ एकर जमीन वादाने राजकीय वातावरण तापले आहे. एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्यावा आणि जैन बोर्डिंगचा बेकायदेशीर जमीन व्यवहार रद्द करावा, अशी मागणी केली आहे. यासोबतच, धंगेकर यांनी २७ ऑक्टोबर २०२५ पासून जैन बोर्डिंग येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या पत्राची प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पाठवण्यात आली आहे. धंगेकरांनी मोदींकडे काय केली मागणी? रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात या मागण्या मांडल्या आहेत. शिवाजीनगरातील ३.५ एकर जैन बोर्डिंग जमीन बेकायदेशीरपणे गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकण्यात आली. हा व्यवहार रद्द करावा. केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी पदाचा गैरवापर करून धर्मादाय आयुक्तांवर दबाव टाकला, असा आरोप आहे. निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी राजीनामा द्यावा. जैन बोर्डिंग आणि इतर मंदिर व देवस्थानच्या जमिनी हडपणाऱ्या टोळीवर कठोर कारवाईसाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमावी. २७ ऑक्टोबरपासून जैन बोर्डिंग परिसरात पुणेकरांसह बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार, जोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत. धंगेकर यांनी पत्रात म्हटले आहे, “गेल्या १८ दिवसांपासून आम्ही पुरावे सादर केले आहेत की, हा व्यवहार मोहोळ यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांमार्फत झाला. मोहोळ यांच्या मंत्रिपदाच्या प्रभावाखाली हा गैरव्यवहार घडला आहे, त्यामुळे ते पदावर असताना निष्पक्ष चौकशी अशक्य आहे.” काय आहे जैन बोर्डिंग वाद शिवाजीनगरातील मॉडेल कॉलनी येथील सेठ हीराचंद नेमचंद जैन बोर्डिंग हाऊसची ३.५ एकर जमीन जैन ट्रस्टच्या ताब्यात आहे, जी विद्यार्थी वसतिगृह, जैन मंदिर आणि सामाजिक कार्यांसाठी वापरली जाते. डिसेंबर २०२४ मध्ये ट्रस्ट विश्वस्तांनी ही जमीन गोखले कन्स्ट्रक्शनला विकण्याचा निर्णय घेतला, जो ८ ऑक्टोबर २०२५ रोजी २३० कोटींना अंतिम झाला. धंगेकर यांनी हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे, कारण ही जमीन दानधर्मासाठी आहे आणि व्यावसायिक विक्री धर्मादाय कायद्याचे उल्लंघन करते. त्यांनी मोहोळ यांच्यावर गोखले बिल्डर्सशी भागीदारी आणि धर्मादाय आयुक्तांवर दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.