Independence Day 2026 : लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान मोदींचा देशाला संदेश; ‘भारत आता छोट्या स्वप्नांनी चालणारा देश नाही’
Independence Day 2026 : 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प मांडला. गेल्या 12 वर्षांतील प्रगतीचा आढावा घेतला.

Independence Day 2026 : 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी तिरंगा फडकावत ‘विकसित भारत’च्या दिशेने देशाच्या वाटचालीचा संकल्प व्यक्त केला. लाल किल्ल्यावर यंदा प्रथमच ‘वंदे मातरम्’चे गायन झाले. त्यानंतर राष्ट्रगीत आणि 21 तोफांची सलामी देण्यात आली.
लाल किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राजघाट येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.
‘प्रत्येक घरात तिरंगा, प्रत्येक मनात तिरंगा’
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशातील प्रत्येक घर तिरंग्याने सजले आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनातही तिरंगा आहे. उत्साह आणि उमंगाने देश नवे संकल्प घेऊन पुढे जात आहे. भारत आता छोट्या स्वप्नांनी चालणारा देश नसून मोठ्या संकल्पांसह विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत आहे.
गरिबी निर्मूलनासह उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ –
गेल्या 12 वर्षांतील प्रगतीचा उल्लेख करताना मोदी यांनी संरक्षण उत्पादनात चार पट, खादी व ग्रामोद्योगात पाच पट आणि इलेक्ट्रिक उत्पादनात सात पट वाढ झाल्याचे सांगितले. रेल्वे कोच निर्मितीत 21 पट, तर मोबाइल फोन उत्पादनात 33 पट वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला.
इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या चार पट झाली असून डिजिटल व्यवहारांमध्ये 100 पट वाढ झाली आहे. नळाद्वारे पाणीपुरवठ्याच्या जोडण्यांचा वेग दरवर्षी सरासरी 15 पट वाढला. गॅस जोडण्या देण्याचा वेग सहा पट, शौचालय निर्मितीचा वेग चार पट, तर गरिबांना घरे देण्याचे काम तीन पट अधिक वेगाने झाल्याचे मोदी यांनी सांगितले.
गेल्या 12 वर्षांत 25 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले असून, याच काळात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये सहभागी झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. 140 कोटी भारतीयांचा संकल्प आता रोखणे कठीण असल्याचे मोदी म्हणाले.
2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य –
भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे मोठे स्वप्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश विकसित होण्याचा संकल्प करतो, तेव्हा जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो.
देश महान होण्यासाठी स्वप्नांसोबत संकल्प आणि ते पूर्ण करण्याची क्षमता आवश्यक आहे. मोठी स्वप्ने विचारांचा विस्तार करतात आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी मजबूत संकल्पाची गरज असते, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, स्वातंत्र्यदिन सोहळ्यात 2,500 एनसीसी कॅडेट्स आणि ‘माय भारत’च्या स्वयंसेवकांनी ज्ञानपथावर ‘वंदे मातरम्’ची आकृती साकारली. सुरक्षेसाठी 15 ते 20 हजार जवान तैनात करण्यात आले असून, एक हजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परिसरावर नजर ठेवण्यात आली. सोहळ्यासाठी सुमारे 5,000 विशेष पाहुणे उपस्थित होते.





