Ravindra Dhangekar: भाजपची खेळी मोडण्यासाठी धंगेकरांची गुगली; मुलगा अपक्ष रिंगणात उतरणार?

प्रभात वृत्तसेवा
पुणे – भाजप- शिवसेना युतीतील जागावाटपात मानापेक्षा अपमानजनक वागणूक नको, असे मी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. मी शिवसेनेबरोबरच आहे. मात्र, काल माझ्या मुलाने मी निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. तो कोठून लढणार, कसा लढणार ते तो ठरवणार, पण एक बाप म्हणून त्याला पाठिंबा मला द्यावा लागेल, असे शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
धंगेकर यांचे चिरंजीव प्रभाग २४ मधून निवडणुक लढविण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. युतीमध्ये भाजपने धंगेकर यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी, असे सांगितले. तशी जागा सोडू असेही सांगितले. मात्र, त्यांच्या मुलाला जागा सुटत नसल्याचे दिसून येते. त्यावर धंगेकर यांनी भाजपची खेळी मोडीत काढण्यासाठी हा गुगली टाकली का, असा प्रश्न उपस्थित होतो.
शनिवारी (दि. २८) रात्री मी घरी गेल्यावर माझ्या मुलाने महापालिका निवडणुकीत मला जागा सुटो अथवा नाही, मी निवडणूक लढविणार असून तुम्ही काही बोलायचे नाही, असे सांगितले. त्याचे रक्त स्वाभिमानी आणि लढवय्या आहे, पुणेकरांनी आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे त्याच्या निर्णयाबाबत मी काही बोलू शकत नाही. मी शिवसेनेबरोबरच राहणार असून, मुलाने कोठून लढायचे, हा त्याचा निर्णय आहे, असे सांगत, धंगेकर यांचा मुलगा प्रभाग २४ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असे स्पष्ट होत आहे.





