Ravindra Chavan : सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; रविंद्र चव्हाण यांची राहुल गांधींवर टीका
काँग्रेसचे 'इंडिया' आघाडीतील अंतर्गत राजकारण आणि विरोधी पक्षांकडून सातत्याने केले जाणारे 'व्होट चोरी'चे आरोप यावरून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी काँग्रेस पक्षावर आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली आहे.

Ravindra Chavan : काँग्रेसचे ‘इंडिया’ आघाडीतील अंतर्गत राजकारण आणि विरोधी पक्षांकडून सातत्याने केले जाणारे ‘व्होट चोरी’चे आरोप यावरून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी काँग्रेस पक्षावर आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पश्चिम बंगालमधील भाजप विधिमंडळ बैठकीतील भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चव्हाण यांनी काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेचे वाभाडे काढले आहेत.
रविंद्र चव्हाण यांनी काँग्रेसच्या राजकारणावर सडकून टीका करताना, सोयीनुसार भूमिका बदलणे हेच काँग्रेसचे खरे रूप असल्याचा आरोप केला. ज्या राज्यांमध्ये तब्बल ४०-४० वर्षे काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री होऊ शकलेला नाही, तिथे काँग्रेसच्याच मित्रपक्षांची सत्ता राहिलेली आहे, या वास्तवाकडे त्यांनी (Ravindra Chavan) लक्ष वेधले.
मतचोरीचा कांगावा करणाऱ्या राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर कधी आत्मपरीक्षण केले आहे का, असा सवाल करत त्यांनी ‘चोराच्या उलट्या बोंबा’ म्हणतात ते हेच, असा सणसणीत टोला लगावला.
कोलकाता येथे झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी देशभरातील विविध राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता किती वर्षांपासून नाही, याचा संपूर्ण लेखाजोखा मांडला होता. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जनतेने सातत्याने काँग्रेसला नाकारले असून, आता तर ‘इंडिया’ आघाडीतही फूट पडायला सुरुवात झाली असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले होते.
शाह यांच्या याच भाषणाचा दाखला देत चव्हाण (Ravindra Chavan) यांनी काँग्रेसच्या पराभवाच्या मालिकेवर आणि मित्रपक्षांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या राजकीय समीकरणांवर जोरदार निशाणा साधला आहे.






