रविना बनली स्क्रिप्टरायटर

सध्याचा जमाना मल्टिटास्किंगचा आहे. केवळ बे एके बे असं म्हणत एकच काम करत राहण्याचे दिवस आता राहिले नाहीत. आज स्पर्धा वाढली आहे. बॉलीवूडसारख्या क्षेत्रात तर नाव कमावणं आणि टिकवणं हे पूर्वीपेक्षा किती तरी अवघड झालं आहे.
कारण इथं नित्यनेमानं येणाऱ्या नव्यांची गर्दी वाढते आहे. कदाचित म्हणूनच की काय अलीकडील काळात बॉलीवूडमधील कलाकार मंडळी केवळ अभिनयामध्येच न रमता त्याच्याशी संलग्न असणाऱ्या याच क्षेत्रातील अन्य गोष्टींमध्ये रस घेऊन नशीब आजमावून पहात आहेत.
बॉलीवूडमधील काही नायिकांनी मध्यंतरीच्या काळात पार्श्वगायन करुन आपल्यातील एका वेगळ्या कौशल्याची ओळख चाहत्यांना करून दिली. काही नायिका निर्मितीच्या, दिग्दर्शनाच्या प्रांताकडेही वळल्या. आता आजच्या नवोदितांपैकी नाही, पण आजही एव्हरग्रीन असलेली रविना टंडनही याच मार्गाने जात पटकथाकार बनली आहे.
रविनाने बॉलीवूडमधील चार प्रोजेक्टस्च्या कथा लिहिल्या आहेत. रविना लवकरच पटकथा लेखनाचे आपले हे कौशल्य जगासमोर आणणार आहे. रविनाने या चारही पटकथा तिच्या स्वतःच्याच ए.ए. फिल्मस् या बॅनरसाठीच लिहिल्या आहेत.





