Ashwin Slams Selectors : “त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे तुटू शकतो”; जैस्वालला वनडे संघातून वगळल्याने अश्विन BCCIवर संतापला
Ashwin Slams Selectors : अश्विनच्या मते, यशस्वी जैस्वालला संधी न मिळाल्यास त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे खचेल. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला संधी देणे ही निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.

R Ashwin Slams Selectors for dropping Yashasvi Jaiswal from New Zealand ODI Squad : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर निवडीवरून नवा वाद उफाळला आहे. उत्तम फॉर्ममध्ये असूनही युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला वनडे संघात स्थान न मिळाल्याने भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने निवड समितीला थेट धारेवर धरले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याच्या संधी न मिळाल्यास या युवा फलंदाजाचा आत्मविश्वास कायमचा खचू शकतो, असा सज्जड इशारा अश्विनने दिला आहे.
“गिल खेळत नसेल, तर जैस्वाल का नाही?”; अश्विनचा थेट सवाल
अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना निवड समितीच्या रणनीतीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. अश्विन म्हणाला, “जर शुबमन गिल शेवटचे दोन वनडे सामने खेळत नसेल, तर नक्कीच त्याच्या जागी यशस्वी जैस्वालची निवड व्हायला हवी होती. हे अत्यंत दुर्दैवी आहे, कारण यामुळे त्याचा आत्मविश्वास तुटू शकतो.” गिल आणि केएल राहुल यांच्या कसोटीच्या तयारीची परिस्थिती आपण समजू शकतो, मात्र जैस्वालला मैदानात उतरण्याची अजिबात संधी न मिळणे चुकीचे असल्याचे त्याने स्पष्ट केले.
“तो पूर्वीसारखा खेळत नाहीये”; मानसिकतेवर परिणाम झाल्याचा दावा
जैस्वालच्या फलंदाजीतील बदलाकडे लक्ष वेधताना अश्विन म्हणाला, “मला असं स्पष्ट जाणवतंय की सातत्याने डावलल्यामुळे त्याचा आत्मविश्वास तुटत चालला आहे. तुम्ही जर त्याची सध्याची फलंदाजी पाहिली, तर तो दोन-तीन वर्षांपूर्वी ज्या निर्भयपणे खेळायचा, तशी फलंदाजी आता करताना दिसत नाही.” एखाद्या दर्जेदार खेळाडूला बाहेर बसवून ठेवल्याने त्याच्या मानसिकतेवर कसा विपरीत परिणाम होतो, हेच अश्विनने अधोरेखित केले.
“तो धावांची मशिन होता, हा तर उघड अन्याय!”; अश्विनचा घरचा आहेर
जैस्वालच्या कामगिरीची आठवण करून देताना अश्विन म्हणाला, “तो धावांची मशिन होता. जेव्हा जेव्हा शक्य असेल, तेव्हा या युवा सलामीवीराला संधी देणे ही निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाची नैतिक जबाबदारी आहे. पण त्याला खेळण्याची कोणतीही संधी मिळत नाहीये आणि हा त्याच्यावर झालेला खूप मोठा अन्याय आहे.” जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद ११० धावांची तुफानी खेळी करूनही जैस्वालला वनडेमधून बाहेर ठेवल्याने अश्विनने बीसीसीआयला उघडे पाडले आहे.





