R Ashwin on Harshit Rana : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीवर दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषत: युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या निवडीबाबत अश्विनने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, त्याचवेळी त्याने हर्षितच्या भविष्यातील संभाव्य यशस्वी कामगिरीबाबतही आशावाद व्यक्त केला आहे. अश्विनच्या मते, हर्षित राणाच्या निवडीमागे त्याची आयपीएल 2024 मधील सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अंतिम सामन्यातील प्रभावी कामगिरी कारणीभूत असू शकते, जिथे त्याने 2 विकेट्स घेतले होते. अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर हर्षितच्या निवडीबाबत सविस्तर मत मांडले. तो म्हणाला, “हर्षित राणाला का निवडले याचे कारण मला समजत नाही. मी निवड समितीच्या बैठकीत जाऊन त्याच्या निवडीमागचे कारण जाणून घ्यायला आवडेल.” कोणाला तरी त्याच्यावर विश्वास आहे – अश्विन पुढे म्हणाला, “माझ्या दृष्टिकोनातून, ऑस्ट्रेलियात अशा वेगवान गोलंदाजाची गरज आहे, जो फलंदाजीही करू शकेल. कोणाला तरी त्याच्यावर विश्वास आहे की तो फलंदाजी करू शकतो, म्हणूनच त्याला संभाव्य नंबर 8 फलंदाज म्हणून निवडले गेले असावे. पण मला त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेबाबत खात्री नाही. दोन वर्षांपूर्वी आयपीएलच्या अंतिम सामन्यात त्याने एक अप्रतिम वेगवान चेंडू टाकला होता, जो नीतीश कुमार रेड्डीच्या बॅटच्या काठाला लागल्याने विकेट मिळाली होती. त्या एका चेंडूमुळे तो बराच काळ चर्चेत आहे.” हेही वाचा – IND W vs SA W : स्मृती मंधानाने वनडेत रचला इतिहास! षटकार ठोकत मोडला २८ वर्षांचा विश्वविक्रम हर्षितमध्ये आहे ‘एक्स-फॅक्टर’, पण निवडीबाबत शंका – अश्विनने हर्षितच्या प्रतिभेला पूर्णपणे नाकारले नसून, त्याच्यामध्ये निश्चितच क्षमता असल्याचे मान्य केले आहे. तो म्हणाला, “हर्षितमध्ये गोलंदाजीची प्रतिभा आहे. जर कोणी म्हणाले की त्याच्यामध्ये कौशल्य नाही, तर मी त्याला मानणार नाही. अशा निवडी कधी कधी खेळाडूला जवळून पाहिल्यावर आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यावर होतात. आज सर्वजण रवींद्र जडेजाला महान खेळाडू म्हणतात, पण एक काळ असा होता जेव्हा लोक विचारत होते की जडेजाची निवड का होत आहे? मी 540 विकेट घेतले, तरीही काही लोक माझ्या निवडीवर प्रश्न उपस्थित करायचे.” हेही वाचा – Shubman Gill : रोहित-विराट आगामी एकदिवसीय विश्वचषकात खेळणार का? गिलने दिलं स्पष्ट उत्तर खरे चित्र मैदानावर खेळताना दिसते – हर्षित राणाला ‘एक्स-फॅक्टर’ संबोधत अश्विन पुढे म्हणाला, “लोक अनेकदा त्यांच्या धारणांवरून बोलतात, पण खरे चित्र मैदानावर खेळताना दिसते. हर्षित राणा दूरवरून काही वेगळा दिसू शकतो, पण जेव्हा तुम्ही त्याच्या भारी चेंडूंचा सामना करता, तेव्हाच त्याच्यातील खासियत समजते. त्याची निवड योग्य आहे की नाही, यावर चर्चा होऊ शकते, पण त्याच्यामध्ये काहीतरी खास आहे हे विसरता कामा नये. तरीही, जर मला विचारले की तो सध्या निवडीसाठी पात्र आहे का, तर माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत.”