Ravi Shastri : ‘बुमराहला वापरण्याची अक्कल नाही!’ रवी शास्त्रीचा अप्रत्यक्ष अजित आगरकरला सणसणीत टोला

Ravi Shastri slams Ajit Agarkar for bumrah workload : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (वय ३१) हा तिन्ही फॉरमॅटमधील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आपल्या शानदार गोलंदाजीने भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याची कामगिरी लौकिकाला साजेशी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटची चर्चा क्रिकेट वर्तुळात जोरदार सुरू आहे. अशात रवी शास्त्री यांनी बुमराहवरून अजित आगरकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली आहे.
जसप्रीत बुमराह नुकत्याच झालेल्या इंग्लंडमधील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये केवळ तीन कसोटी सामने खेळला. आता बुमराहच्या निवडीवर आणि वर्कलोड मॅनेजमेंटवर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या धोरणावर निशाणा साधला.
रवी शास्त्रींनी काढली अक्कल –
प्रभात खबरला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले, “बुमराह हा दादा बॉलर आहे. पण बुमराहला संघात घ्यायला आणि त्याचा योग्य वापर करून घ्यायला ‘अक्कल’ लागते. तुम्ही त्याला मर्यादित षटकांचा गोलंदाज करून टाकलं आहे. त्यामुळे तो आता कसोटीचा गोलंदाज कसा होणार?”
हेही वाचा – IND vs SA : रोहित-यशस्वीचा धमाका! २५ वर्षांपूर्वीचा सचिन-गांगुलीचा विक्रम मोडला!
दुखापतीमुळे वाढलेली काळजी –
शास्त्रींनी आठवण करून दिली की, त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या काळात बुमराहने टीकाकारांना खोटे ठरवत कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केले. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ५ सामने खेळल्यानंतर बुमराहला पाठीची दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागले.
वर्कलोड मॅनेजमेंटचे नियोजन
या दुखापतीच्या पार्श्वभूमीवर, सध्याचे संघ व्यवस्थापन बुमराहच्या बाबतीत अत्यंत काळजीपूर्वक पाऊले उचलत आहे, ज्यामुळे त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर अधिक लक्ष दिले जात आहे. बुमराहच्या दुखापतीची भीती लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाने त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत *फक्त ३ सामने खेळायचे हे आधीच ठरवले होते. या निर्णयामुळे त्याला टीकेलाही सामोरे जावे लागले.
हेही वाचा – IND vs SA : जैस्वालच्या शतकाने डी कॉकच्या खेळीवर फेरलं पाणी, निर्णायक लढतीत टीम इंडियाचा दणक्यात विजय!
बुमराह आता इंग्लंड मालिकेव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सर्व एकदिवसीय मालिकांसाठी तसेच वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठी उपलब्ध होता. तो आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठीही उपलब्ध असणार आहे.





