Ration Distribution: शासनाच्या आदेशाला केराची टोपली! १५ जूनची मुदत संपली तरी हजारो लाभार्थी धान्यापासून वंचित
Ration Distribution: नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने दिली होती १५ जूनची डेडलाईन; मुदत संपूनही पुण्यातील अनेक लाभार्थी हक्काच्या धान्यापासून वंचित.

Ration Distribution – नागरिकांना दरमहा मिळणारे शासकीय धान्य वेळेत उपलब्ध व्हावे आणि लाभार्थ्यांची गैरसोय टाळावी, यासाठी शासनाने जून महिन्याच्या धान्य वाटपाची प्रक्रिया १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, ही मुदत संपूनही शहरातील अनेक लाभार्थ्यांना अद्याप धान्य मिळाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी झाली का, असा प्रश्न उपस्थित होत असून, अन्न धान्य वितरण व पुरवठा विभागाने पुन्हा एकदा मुदतवाढीची मागणी केली आहे.
धान्य वाटप पूर्ण करण्यात आले नसल्याने पुणे पुरवठा विभागाकडून शासनाकडे अतिरिक्त वेळ मागण्यात आला आहे. त्यामुळे शासनाकडून यासंदर्भात कोणते निर्देश दिले जातात आणि मुदतवाढ मंजूर केली जाते की जबाबदारांवर कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, धान्य वितरणाबाबत विभाग आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात विसंगत माहिती समोर येत आहे. काही स्वस्त धान्य दुकानदारांचे म्हणणे आहे की, संबंधित धान्य वेळेत दुकानांपर्यंत पोचलेच नाही.
त्यामुळे वितरण प्रक्रिया सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या. दुसरीकडे, अन्न धान्य वितरण व पुरवठा विभागाकडून ११ जून रोजीच धान्य संबंधित दुकानांमध्ये पोचविण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानदारांनीही आपली अडचण मांडली आहे. धान्य ११ जूनला प्राप्त झाले असे गृहीत धरले तरी केवळ पाच दिवसांच्या कालावधीत संपूर्ण लाभार्थ्यांना धान्य वाटप करणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लाभार्थ्यांची संख्या मोठी असून, वितरणासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि वेळ यांचाही विचार करणे गरजेचे असल्याचे दुकानदार सांगत आहेत.
शहरातील सुमारे ३० टक्के लाभार्थी सुट्टीनिमित्त आपल्या मूळ गावी गेल्याने धान्य स्वीकारले नसल्याचे पुरवठा विभागाचे म्हणणे आहे. मात्र, शासनाने दिलेल्या स्पष्ट सूचनांनंतरही धान्य वाटपाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता शासनाकडून मुदतवाढ मंजूर केली जाणार की आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई केली जाणार, याबाबतची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. लाभार्थ्यांनाही त्यांच्या हक्काचे धान्य वेळेत मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“सर्व स्वस्त धान्य दुकानात ११ जून रोजीच धान्य पुरवठा झाला आहे. ३० टक्के नागरिक बाहेर गावी गेल्याने धान्य वाटप १५ तारखेपर्यंत होऊ शकले नाही. दर महिन्याला ३० तारखेपर्यंतच धान्य वाटप होते. यामुळे यामहिन्यातही ३० जून पर्यंत मुदतवाढ मागितली आहे.”
– प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण व पुरवठा अधिकारी. पुणे.






