Purandar Water Scarcity – दोन महिन्यांपासून उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. पुरंदर तालुक्यातील अनेक गावांतील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांकडून ‘टँकर’ सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत होती. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुरंदर तालुक्यातील नऊ गावठाणसह, वाड्या-वस्त्यांवर शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. नऊ गावठाणसह, वाड्या-वस्त्यांवर ९ पाण्याचे टँकरच्या माध्यमातून दिवसभरात ३८ खेपा सुरू केल्याची माहिती पुरंदर पंचायत समितीने दिली. तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासोबतच, शेतीच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न ग्रामीण भागात तीव्र होत आहे. पुरपोखर, भिवरी, पिसे, साकुर्डे, बहिरवाडी, वाघदावाडी, भिवडी, राख, राजुरी या गावांत दररोज नऊ टँकरच्या माध्यमातून ३८ खेपा सुरू केल्या आहेत. वाल्हे तसेच शिवरी येथे टॅंकर सुरू करण्याची मागणी असून प्रस्तावाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. पुढील काही दिवसांत शासकीय टँकरने पाणीपरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पुरंदर उपअभियंता रितेश मुंडे यांनी सांगितले. आगामी काळात काही गावांमधून टँकरची मागणी वाढणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या कमी असली, तरी जलजीवन मिशनची कामे अर्धवट असल्याने टंचाईच्या झळा अधिक तीव्र जाणवत आहेत. सध्या तालुक्यातील नऊ गावठाणसह वाड्या-वस्त्यांवर टँकर सुरू असून अनेक भागात पाणीटंचाई भासत असलेल्या नवीन गावांकडूनही टँकरसाठी मागणी वाढ होणार आहे. अनेक गावांत श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून दोन टँकरच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावांतील वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा सुरू आहे.