भवानीनगर : फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाची चाहूल लागली असली, तरी मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा अचानक वाढला आहे. इंदापूर आणि बारामती तालुक्यात उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्याने, श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील रसवंती गृहे प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. यंदा पावसाळा आणि थंडीचा जोर अधिक होता, मात्र आता मार्चमध्येच उन्हाचा तडाका वाढल्याने वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच सूर्याची प्रखरता जाणवू लागते. विशेषतः दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत कडक ऊन असल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. कामानिमित्त बाहेर पडणार्या नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळावा, यासाठी रसवंती गृहांचा आधार घ्यावा लागत आहे. रसाच्या एका पेल्यामुळे शरीराला थंडावा मिळत असला, तरी पुढील दोन-तीन महिने हा उन्हाळा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. वाढत्या उष्म्यामुळे लहान मुलांच्या आणि ज्येष्ठांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी आणि नागरिकांनी महत्त्वाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाचा कडाका कमी झाल्यावर उरकून घ्यावीत, असा सल्ला दिला जात आहे. निर्जलीकरण टाळण्यासाठी ‘हे’ करा स्वच्छ आणि मुबलक पाणी प्यावे. शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून वेळोवेळी द्रवपदार्थ घ्यावेत. बाहेरील दुधाचे आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. कडक उन्हात जाणे टाळून स्वतःचे रक्षण करावे. उन्हाळा कडक असल्याने लहान मुलांबरोबरच मोठ्या माणसांना देखील जुलाब आणि उलट्या तसेच लहान मुलांमध्ये गॅस्ट्रोची साथ आल्याने उन्हाळ्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन ‘डी-हायड्रेशन’चा धोका वाढतो. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिणे हाच उत्तम उपाय आहे. तसेच आहार हलका आणि ताजा असावा. – डॉ. संग्राम देवकाते, भवानीनगर हेही वाचा : SSC Exam Paper Leak : दहावीचे गणिताचे पेपर लीक?; पुणे बोर्डाकडून पोलिसांत धाव