SSC Exam Paper Leak : दहावीचे गणिताचे पेपर लीक?; पुणे बोर्डाकडून पोलिसांत धाव
SSC Exam Paper Leak : टेलिग्रामवर आधीच आले होते बोर्डाचे पेपर

SSC Exam Paper Leak : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या सुरू असलेल्या परीक्षेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणिताचे दोन्ही पेपर परीक्षा होण्यापूर्वीच चक्क एका टेलिग्राम ग्रुपवर लीक झाले असून, याप्रकरणी बोर्डाच्या पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
विशेष म्हणजे यातील एक पेपर तीन दिवस अगोदरच टेलिग्राम ग्रुपवर टाकण्यात आला होता. त्यानुसार टेलिग्राम ग्रुप अॅडमिन आणि त्यातील सदस्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुणे विभागीय मंडळाचे सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर यांनी फिर्याद दिली आहे. जेवळीकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ मार्च २०२६ रोजी बोर्डाच्या अधिकार्यांना एका संशयास्पद टेलिग्राम लिंकची माहिती मिळाली.
जेव्हा बोर्डाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या ग्रुपची तपासणी केली, तेव्हा संशयास्पद बाबी आढळून आल्या. ६ मार्च रोजी होणारा गणित भाग-१ चा पेपर ५ मार्चला रात्री ८ वाजून ३७ मिनिटांनी या ग्रुपवर टाकण्यात आला होता, तसेच ९ मार्च रोजी झालेला गणित भाग-२ चा पेपर तर चक्क ६ मार्चला दुपारी ४ वाजून ५६ मिनिटांनी म्हणजेच तीन दिवस आधीच या ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आला होता.
या टेलिग्राम ग्रुपवर आलेले पेपर आणि बोर्डाने अधिकृतपणे काढलेले पेपर यांची जेव्हा प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली, तेव्हा ते दोन्ही पेपर अगदी सारखेच असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे परीक्षेची गोपनीयता पूर्णपणे मोडीत निघाल्याचे समोर आले आहे.
या सर्व प्रकारामुळे राज्य शिक्षण मंडळाने तातडीने पावले उचलत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा पेपर नेमका कोठून लीक झाला, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.





