Chinmay Sutar : मुंबईकर चिन्मय सुतारची विक्रमी खेळी ! रणजीमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
Chinmay Sutar : भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात रणजी ट्रॉफी २०२६-२७ च्या हंगामात एका सुवर्ण अध्यायाची नोंद झाली.

Chinmay Sutar : भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात रणजी ट्रॉफी २०२६-२७ च्या हंगामात एका सुवर्ण अध्यायाची नोंद झाली. नागालँड क्रिकेट स्टेडियममध्ये मिझोरम आणि नागालँड यांच्यात प्लेट डिव्हिजनचा सामना सुरू होता.
एकेकाळी पदार्पणाच्या सामन्यात अवघ्या एका धावेने शतकापासून वंचित राहिलेला आणि ९९ धावांवर दुर्दैवी धावबाद झालेला एक फलंदाज आज मैदानात एका वेगळ्याच निश्चयाने उतरला होता. मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफी खेळलेल्या या प्रतिभावान डावखुऱ्या फलंदाजाच्या मनात काहीतरी अभूतपूर्व घडवण्याची जिद्द धगधगत होती.
तो फलंदाज म्हणजे मिझोरमचा चिन्मय सुतार (Chinmay Sutar). सामन्यादरम्यान मिझोरमचा नववा फलंदाज बाद झाला आणि शेवटची जोडी मैदानात उरली, तेव्हा चिन्मय २३१ धावांवर खेळत होता. संघ सर्वबाद होण्याच्या उंबरठ्यावर असताना चिन्मयने नागालँडच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला.
मैदानाच्या चहूबाजूंना फटक्यांची आतषबाजी करत त्याने (Chinmay Sutar) ४६ दणदणीत चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार खेचले. अखेर ५१७ चेंडूंचा सामना करत त्याने नाबाद ४०० धावांचा जादुई आकडा गाठला. मिझोरमने ९ बाद ५८१ धावांवर डाव घोषित केला, पण तोपर्यंत चिन्मयने क्रिकेटविश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये तब्बल ७८ वर्षांनंतर अशी ऐतिहासिक खेळी पाहायला मिळाली. यापूर्वी १९४८ मध्ये पुण्यात खेळताना महाराष्ट्राच्या भाऊसाहेब निंबाळकर यांनी नाबाद ४४३ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती.
निंबाळकरांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये ४०० धावांचा टप्पा ओलांडणारा चिन्मय हा केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. या विक्रमी खेळीसह त्याने डॉन ब्रॅडमन आणि ब्रायन लारा यांसारख्या जगातील १० महान दिग्गजांच्या पंक्तीत आपले नाव (Chinmay Sutar) कायमचे कोरले आहे.
४०० हुन अधिक धावा करणारे फलंदाज
ब्रायन लारा – ५०१ धावा
हानिफ मोहम्मद – ४९९ धावा
डॉन ब्रॅडमन – ४५२ धावा
भाऊसाहेब निंबाळकर – ४४३ धावा
बिल पॉन्सफॉर्ड – ४३७ धावा
बिल पॉन्सफॉर्ड – ४२९ धावा
अफताब बलोच – ४२८ धावा
आर्ची मॅकलॅरेन – ४२४ धावा
सॅम नॉर्थइस्ट – ४१० धावा
ग्रीक हिक – ४०५ धावा
ब्रायन लारा – ४०० धावा
चिन्मय सुतार (Chinmay Sutar) – ४०० धावा






