Mumbai T20 Fight : मुंबई टी-२० लीगच्या फायनलमध्ये तुफान राडा! शेवटच्या ओव्हरमध्ये दोन्ही संघाचे खेळाडू भिडले; पाहा VIDEO
Mumbai T20 Fight : शेवटच्या षटकांमध्ये मैदानावर आणि मैदानाबाहेर असा काही हाय-वोल्टेज ड्रामा रंगला की दोन्ही संघांचे खेळाडू, कर्णधार आणि सपोर्ट स्टाफ एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

Mumbai T20 League Final Fight Video : मुंबई टी-२० लीग २०२६ च्या फायनल सामन्यात क्रिकेटच्या मैदानाला युद्धाचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले. सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये मैदानावर आणि मैदानाबाहेर असा काही हाय-वोल्टेज ड्रामा रंगला की दोन्ही संघांचे खेळाडू, कर्णधार आणि सपोर्ट स्टाफ एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एमएससी मराठा रॉयल्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे आणि एआरसीएस अंधेरीचा फलंदाज गौरव जाथर यांच्यात झालेल्या तीव्र वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होत असून क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.
आधी मैदानावर वाद, मग डगआऊटमध्ये राडा!
१३ जून रोजी खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात अंधेरीने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली होती. प्रथम फलंदाजी करताना मराठा रॉयल्सने चिन्मय सुतारच्या अर्धशतकाच्या जोरावर ५ बाद १५४ धावा केल्या होत्या. खरा वाद १९ व्या षटकात सुरू झाला, जेव्हा अंधेरीचा गौरव जाथर आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने फिरकीपटू इरफान उमैरला एक मोठा षटकार ठोकला, पण पुढच्याच चेंडूवर उमैरने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. जाथर बाद होताच मराठा रॉयल्सच्या खेळाडूंनी त्याच्या समोर जात आक्रमक जल्लोष केला.
Big fight in T20 Mumbai final 🤯
For a second i thought they would hit each other ☠️ pic.twitter.com/Tlvo9xv2i8— Heisenberg 🇮🇳 (@Internetumpire7) June 14, 2026
हे पाहून गौरव जाथरचा पारा चढला आणि त्याची तुषार देशपांडेसोबत तीक्ष्ण शब्दांत जुंपली. अंपायर्सनी मध्यस्थी करत हा वाद तात्पुरता शांत केला.परंतु, सामना संपत आला असताना मराठा रॉयल्सचा एक खेळाडू थेट एआरसीएस अंधेरीच्या डगआऊटपाशी (Dugout) गेला, जिथे कर्णधार शिवम दुबे आणि इतर राखीव खेळाडू बसले होते. तिथे पुन्हा गौरव जाथर आणि त्या खेळाडूमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली. दोन्ही बाजूंचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफने मध्ये पडून खेळाडूंना मागे ओढले.
ट्रॉफी जिंकली, पण ‘एमसीए’ कारवाई करणार!
Big fight in t20 Mumbai final!!
– Shivam Dube to rescue.🤯 pic.twitter.com/niaNJntnpM
— Cricket Central (@CricketCentrl) June 14, 2026
या सर्व हाय-वोल्टेज ड्राम्यामध्ये मराठा रॉयल्सने अंधेरीला ८ बाद १४६ धावांवर रोखत अवघ्या ८ धावांनी सामना जिंकून ट्रॉफीवर नाव कोरले. मात्र, अंतिम सामन्यातील या असभ्य वर्तनामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आता दोषी खेळाडूंवर मोठी शिस्तभंग कारवाई किंवा दंडात्मक बडगा उगारण्याची शक्यता आहे.





