Ranji Trophy 2024/25 : चेतेश्वर पुजारानं पुन्हा गाजवलं मैदान, द्विशतक झळकावत रचली विक्रमांची मालिका…

Ranji Trophy 2024/25 (cheteshwar Pujara) : एकीकडे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे, तर दुसरीकडे रणजी ट्रॉफीचे सामने खेळले जात आहेत. भारतीय संघात संधी न मिळालेले अनेक खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करून आपली दावेदारी मजबूत करत आहेत. भारताकडून तो मागच्या वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा खेळला होता. 36 वर्षीय चेतेश्वर त्यानंतर भारताच्या कसोटी संघातून बाहेर असलेला अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारानेही चमकदार कामगिरी केली आहे. पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 18 वे द्विशतक झळकावले आहे, जो एक विक्रम आहे.
चेतेश्वर पुजारा सध्या भारतीय कसोटी संघापासून दूर असला तरी लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये तो सातत्याने धावा करत आहे. इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळल्यानंतर चेतेश्वर पुजारा आता रणजी ट्रॉफी खेळत आहे. पहिल्या सामन्यात तामिळनाडूविरुद्ध त्याची बॅट चालली नसली तरी दुसऱ्या सामन्यातच त्याने आपल्या शतकाचे द्विशतकात रूपांतर केले. यासह त्याने एक इतिहासही रचला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 18 किंवा त्याहून अधिक व्दिशतके (Cheteshwar Pujara scored a double century) करणारा तो जगातील चौथा क्रिकेटपटू तर भारताकडून सर्वाधिक द्विशतके करणारा पहिला खेळाडू ठरलाय.
अशी कामगिरी करणारा जगातील चौथा क्रिकेटपटू..
चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2024-25 हंगामात 348 चेंडूत दुहेरी शतक पूर्ण केले. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 18 वे द्विशतक आहे. आजच त्याने शतक पूर्ण केले होते, जे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 66 वे शतक होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फक्त सर डॉन ब्रॅडमन (37), वॅली हॅमंड (36) आणि पॅटसी हेन्ड्रेन (22) यांनी अधिक द्विशतके झळकावली आहेत. पुजाराने हर्बर्ट सटक्लिफ आणि मार्क रामप्रकाश यांना मागे टाकले आहे. या दोन्ही दिग्गज फलंदाजांनी लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये 17-17 द्विशतके झळकावली आहेत, तर पुजाराच्या द्विशतकांची संख्या 18 वर पोहोचली आहे.
Most double centuries in First Class Cricket
37 – Don Bradman
36 – Wally Hammond
22 – Patsy Hendren
18 – Cheteshwar Pujara
17 – Herbert Sutcliffe
17 – Mark Ramprakash pic.twitter.com/Mbxd8s7nLJ— CricTracker (@Cricketracker) October 21, 2024
भारताकडून सर्वाधिक द्विशतके करणारा पहिला खेळाडू..
विजय मर्चंटने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 11 वेळा द्विशतक झळकावले होते, तर विजय हजारे, सुनील गावस्कर आणि राहुल द्रविड यांनी प्रत्येकी 10 वेळा असे केले आहे. पुजाराने या सर्व महान खेळाडूंना खूप आधी मागे सोडले आहे. या यादीत वसीम जाफर आणि पारस डोगरा यांचीही नावे आहेत, ज्यांनी प्रत्येकी 9 वेळा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्यात यश मिळवले आहे.
Cheteshwar Pujara holds the record for the most double centuries (18) by an Indian in first-class cricket. pic.twitter.com/uFhROwQT8D
— CricTracker (@Cricketracker) October 21, 2024
पारस डोगराच्या विक्रमाची बरोबरी
पुजाराचे हे प्रथम श्रेणीतील 18वे द्विशतक तर रणजी ट्राफीतली नववे द्विशतक देखील ठरले. यासह तो रणजी ट्रॉफीमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक द्विशतके करणारा फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने रणजी ट्रॉफीमध्ये नऊ द्विशतके झळकावणाऱ्या पारस डोगराच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीमध्येही चौथ्या स्थानी..
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीमध्येही चौथ्या स्थानी पोहोचलय. यादीमध्ये सुनील गावसकर(25,834), सचिन तेंडुलकर (25,396) आणि राहुल द्रविड (23,784) हे अनुक्रमे पहिल्या तीन स्थानी असून चौथ्या स्थानी चेतेश्वर पुजाराचा क्रमांक लागतो. पुजाराच्या नावे एकूण 21,149 धावांची नोंद झाली आहे.
ब्रायन लारालाही टाकले मागे…
पुजाराने व्दिशतकाच्या आधी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 66 वे तर रणजीतील 25 वे शतक झळकावले. रणजी करंडक स्पर्धेत सध्या खेळत असलेल्या फलंदाजांमध्ये पारस डोग्रा (30) हा शतकांच्या बाबतीत पुजाराच्या (25) पुढे आहे. तर यासह पुजाराने 66 वे प्रथम श्रेणी शतक झळकावून वेस्ट इंडिजच्या माजी दिग्गजाचा विक्रम मोडला आहे. वेस्ट इंडिजचा महानफलंदाज ब्रायन लाराने आपल्या कारकिर्दीत 65 प्रथम श्रेणी शतके झळकावली आहेत.
प्रथम श्रेणीमध्ये भारताकडून सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत पूजारा तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. यादीत सुनील गावस्कर व सचिन तेंडुलकर 81 शतकांसह पहिल्या तर राहुल द्रविड 68 शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे.
Ranji Trophy 2024/25 : मुंबईचा महाराष्ट्रावर दणदणीत विजय, शतकवीर आयुष्य ठरला सामन्याचा मानकरी….
सौराष्ट्र विरूध्द छत्तीसगड सामना अनिर्णित…
चेतेश्वर पुजाराने छत्तीसगडविरुद्ध 234 धावांची खेळी खेळली. त्याने 383 चेंडूंचा सामना केला आणि 25 चौकार आणि एक षटकार लगावला. पुजाराच्या या खेळीमुळे सौराष्ट्र संघाने छत्तीसगडविरुद्ध दमदार पुनरागमन केले. छत्तीसगड संघाने सात गड्यांच्या मोबदल्यात 578 धावा करून पहिला डाव घोषित केला होता, याला प्रत्युत्तर म्हणून पुजाराच्या द्विशतकाच्या जोरावर सौराष्ट्राने खेळाच्या चौथ्या दिवशी आठ गडी बाद 478 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात चेतेश्वर पुजाराला शेल्डन जॅक्सन (62 धावा) आणि अर्पित वासवडा (73) यांची साथ लाभली. दरम्यान, रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पुजारा फ्लॉप ठरला, तमिळनाडूविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने 16 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही, मात्र छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार खेळी केली.





