Ranjangaon : बनावट सोन्यावर गोल्ड लोन; HDFC बँकेची 17.76 लाखांची फसवणूक; 12 जणांविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक
Ranjangaon : या गुन्ह्यात लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा) आणि मच्छिंद्र दिगंबर खैरनार (रा. रांजणगाव) यांना दि. 25 मे 2026 रोजी रात्री अटक करण्यात आली. न्यायालयाने लक्ष्मण वीर याला 29 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून मच्छिंद्र खैरनार याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

Ranjangaon : बनावट सोने गहाण ठेवून गोल्ड लोन उचलत HDFC बँकेची तब्बल 17 लाख 76 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात 12 जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी बँकेच्या वतीने शैलेश लालासाहेब जाधव (वय 33, रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 336(2), 338, 336(3), 340(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय ?
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 जानेवारी 2025 ते 28 मार्च 2025 या कालावधीत रांजणगाव येथील HDFC बँक शाखेत आरोपींनी संगनमत करून बनावट सोने खरे असल्याचा बनाव केला. मुख्य आरोपी लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर याच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी बनावट दागिने गहाण ठेवून गोल्ड लोन मंजूर करून घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात बँकेकडून नियुक्त करण्यात आलेला गोल्ड लोन व्हॅल्युअर संजय हिराचंद पंडित याच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सोने बनावट असल्याची माहिती असतानाही त्याने ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बँकेची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
दोघांना अटक –
या गुन्ह्यात लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा) आणि मच्छिंद्र दिगंबर खैरनार (रा. रांजणगाव) यांना दि. 25 मे 2026 रोजी रात्री अटक करण्यात आली. न्यायालयाने लक्ष्मण वीर याला 29 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून मच्छिंद्र खैरनार याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, इतर आरोपींमध्ये प्रतीक मांडगे, किरण सुरवसे, ऋषिकेश देशमुख, तन्मय जगदाळे, दीपक बोराडे, बाजीराव शेळके, अभिषेक जोंधळे, मयूर लंघे, संजय पंडित आणि प्रवीण गवळी यांचा समावेश आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलकंठ तिडके करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे रांजणगाव परिसरात खळबळ उडाली असून बँकिंग व्यवहारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





