Stock Market: दोन दिवसांची तेजी खंडित; ‘या’ कारणामुळे सेन्सेक्स 479 अंकांनी घसरला
Stock Market: सेन्सेक्समधील प्रमुख घसरणाऱ्या समभागांमध्ये भारती एअरटेल, ट्रेंट, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), बजाज फायनान्स, टायटन आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश होता. दुसरीकडे टेक महिंद्रा, इटर्नल, मारुती आणि अदानी पोर्ट्स या समभागांनी वाढ नोंदवली.

Stock Market: पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर मंगळवारी दिसून आला. दोन दिवसांची तेजी खंडित करत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४७९ अंकांनी घसरला, तर निफ्टीही ११८ अंकांनी खाली आला. दिवसभर बाजारात मोठी चढ-उताराची स्थिती पाहायला मिळाली.
सेन्सेक्स ७६,००९.७० अंकांवर बंद – (Stock Market)
बीएसईचा ३० समभागांचा सेन्सेक्स ४७९.२६ अंकांनी अर्थात ०.६३ टक्क्यांनी घसरून ७६,००९.७० अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान तो तब्बल ५७९ अंकांनी कोसळून ७५,९०९.६८ अंकांपर्यंत खाली आला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११८ अंकांनी म्हणजेच ०.४९ टक्क्यांनी घसरून २३,९१३.७० अंकांवर स्थिरावला.
या शेअरमध्ये घसरण – (Stock Market)
सेन्सेक्समधील प्रमुख घसरणाऱ्या समभागांमध्ये भारती एअरटेल, ट्रेंट, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), बजाज फायनान्स, टायटन आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश होता. दुसरीकडे टेक महिंद्रा, इटर्नल, मारुती आणि अदानी पोर्ट्स या समभागांनी वाढ नोंदवली.
दरम्यान, ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत जवळपास २.९३ टक्क्यांची वाढ होऊन ते प्रति बॅरल ९८.९६ डॉलरवर पोहोचले. अमेरिकेने दक्षिण इराणमध्ये नव्याने लष्करी कारवाया केल्याच्या वृत्तांमुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे ऊर्जा पुरवठा खंडित होण्याची भीती पुन्हा वाढली आहे.
तज्ज्ञांचे मत –
‘लाइफलाँग वेल्थ’चे संस्थापक आणि संशोधन विश्लेषक हरिप्रसाद के. यांनी सांगितले की, सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किंमतीतील नरमाई आणि सकारात्मक जागतिक संकेतांमुळे बाजार स्थिर होता. मात्र, अमेरिकेच्या लष्करी कारवाईच्या वृत्तांनंतर गुंतवणूकदारांनी जोखीम टाळण्याचा पवित्रा घेतला आणि बाजारातील वातावरण अचानक नकारात्मक झाले.
ते पुढे म्हणाले की, भारतासारख्या तेल आयातीवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती महागाई, रुपयावरील दबाव आणि वित्तीय तुटीच्या चिंतेला पुन्हा खतपाणी घालतात.
आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक वाढीसह बंद झाला, तर जपानचा निक्केई, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक घसरले. युरोपातील बाजारांमध्येही बहुतांश ठिकाणी घसरण दिसून आली.
जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबतचा आशावाद लष्करी कारवाईच्या वृत्तांमुळे मावळला. परिणामी कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आणि रुपयातील मजबुतीही कमी झाली.
दरम्यान, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ८२१.७५ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली होती. सोमवारी सेन्सेक्समध्ये १,०७३ अंकांची तर निफ्टीमध्ये ३१२ अंकांची जोरदार वाढ झाली होती.
रूपया ४७ पैशांनी घसरला –
मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ४७ पैशांनी घसरून ९५.७३ (तात्पुरता) वर बंद झाला. पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे रुपयावर हा दबाव आल्याचे पाहायला मिळाले.
फॉरेक्स (परकीय चलन) व्यापाऱ्यांच्या मते, अमेरिकन डॉलरची मजबूत स्थिती आणि देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीमुळेही रुपयावर दबाव वाढला आहे.





