Stock Market Updates : ‘या’ कारणामुळे शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स 1073 अंकांनी वधारला
Stock Market Updates : सेन्सेक्समधील प्रमुख वाढणाऱ्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी बँक, इटर्नल, बजाज फिनसर्व्ह आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश होता. दुसरीकडे इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), सन फार्मा आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांच्या समभागांमध्ये घसरण झाली.

Stock Market Updates : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली मोठी घसरण आणि अमेरिका-इराण चर्चेबाबत सकारात्मक संकेत यामुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १ टक्क्यांहून अधिक वाढीसह ७६ हजारांच्या पुढे बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २४ हजारांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला.
बीएसईचा ३० समभागांचा सेन्सेक्स १,०७३.६१ अंकांनी अर्थात १.४२ टक्क्यांनी वधारून ७६,४८८.९६ अंकांवर बंद झाला. दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्सने १,१४३.७२ अंकांची उसळी घेत ७६,५५९.०७ अंकांपर्यंत मजल मारली होती. एनएसईचा निफ्टी निर्देशांक ३१२.४० अंकांनी म्हणजेच १.३२ टक्क्यांनी वाढून २४,०३१.७० अंकांवर स्थिरावला.
कोणते शेअर्स वाढले ? (Stock Market Updates )
सेन्सेक्समधील प्रमुख वाढणाऱ्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी बँक, इटर्नल, बजाज फिनसर्व्ह आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश होता. दुसरीकडे इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), सन फार्मा आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांच्या समभागांमध्ये घसरण झाली.
वाढीची प्रमुख कारणे – (Stock Market Updates )
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमती ५.५२ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ९७.८२ डॉलरवर आल्या. अमेरिका आणि इराण यांच्यात ‘स्ट्रेट ऑफ होर्मूझ’ पुन्हा सुरू करण्यासंदर्भात चर्चेत प्रगती झाल्याच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे सांगितले जात आहे.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹६.५२ लाख कोटींची वाढ
मागील व्यवहाराच्या दिवशी, म्हणजेच २२ मे २०२६ रोजी बीएसईवर (BSE) लिस्टेड असलेल्या सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप ₹४,६२,२५,२२०.२६३ कोटी होते. आज, म्हणजेच २५ मे २०२६ रोजी बाजार बंद होताना ते ₹४,६८,७७,५६२.१४ कोटींवर पोहोचले. याचा अर्थ असा की, गुंतवणूकदारांच्या भांडवलात तब्बल ₹६,५२,३४१.८७७ कोटींची भर पडली आहे.
तज्ज्ञांचे मत –
जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, “कच्च्या तेलाच्या किमतींतील घसरण आणि अमेरिका-इराण कराराच्या शक्यतेमुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. जागतिक बाजारातील तेजीचाही भारतीय बाजाराला आधार मिळाला.”
आशियाई बाजारात जपानचा निक्केई आणि चीनचा शांघाय निर्देशांक वाढीसह बंद झाले. दक्षिण कोरिया आणि हाँगकाँग बाजार सुटीमुळे बंद होते. युरोपीय बाजारातही तेजीचे वातावरण दिसून आले. अमेरिकन बाजार शुक्रवारी सकारात्मक पातळीवर बंद झाले होते.
दरम्यान, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) शुक्रवारी भारतीय बाजारातून ४,४४०.४७ कोटी रुपयांची निव्वळ विक्री केल्याची माहिती शेअर बाजार आकडेवारीतून समोर आली.






