रांजणगाव गणपती । कंपनीच्या दूषित, केमिकल युक्त पाण्यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत

रांजणगाव गणपती । येथील औद्योगिक वसाहती मधील महाराष्ट्र एंव्हायरो पावर लिमिटेड या कंपनीच्या दूषित व केमिकल युक्त पाण्यामुळे निमगाव भोगीकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ” एम. ई. पी.एल. हटाव गाव बचाव ” अशी आर्त हाक देऊन निमगाव भोगीकरांनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी नुकतेच रास्ता रोको आंदोलन केले. व पुढील आंदोलन थेट कंपनीच्या गेट वरती करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या विभागाचे नेतृत्व करणारे आजी माजी खासदार, डॉक्टर अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव पाटील,शिरूर आंबेगाव मतदार संघाचे आमदार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी या विषयांमध्ये लक्ष घालून ही अद्याप निमगाव भोगीकरांना न्याय मिळाला नाही. निमगाव भोगी ग्रामस्थांच्या मागण्या मान्य झाल्या नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
राज्याचा एक मंत्री, विद्यमान खासदार, माजी खासदार, एक आमदार , एम ई पी एल कंपनीच्या दूषित पाण्यासंदर्भात आंदोलन करणारे संजय पाचंगे, शेखर पाचुंदकर, निमगाव भोगी ग्रामस्थ, त्याचबरोबर ढोक सांगवी, कर्डेलवाडी, सरदवाडी, अण्णापुर, आमदाबाद, रामलिंग , या परिसरातूनही यशवंत पाचंगे, शशिकांत दसगुडे, आबासाहेब सरोदे, प्रकाश थोरात, या सारखी राजकीय नेते मंडळी व अनेक ग्रामस्थ या एम. ई. पी. एल. हटाव आंदोलनात उतरले असून अद्यापही शासन दरबारी कुठलाही ठोस निर्णय होताना दिसत नाही. शासकीय यंत्रणा आंदोलकांशी व ग्रामस्थांशी वेळकाढूपणा करत असल्याचे दिसून येत आहे. कारण जी गोष्ट सरकारने मागील दहा वर्षात केली नाही. ती ऐन निवडणुकीच्या तोंडावर कशी करेल. कारण येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊ शकते.
एकदा का आचारसंहिता जाहीर झाली मग सर्व शासकीय यंत्रणा व राजकीय नेते मंडळी हात वर करून आता आम्ही काही करू शकत नाही असे बोलून वेळ मारून नेणार आहेत. व यात किती महिने जातील व आंदोलन कसे शांत होईल याचे आराखडे आखूनच आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. २० सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या रास्ता रोकोच्यावेळी पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाने रास्ता रोको झाल्यावरती होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध नियोजन करून आंदोलकांना विचार करायला भाग पाडले होते. मग हेच वाहतुकीचे नियोजन पोलीस प्रशासन व अन्य शासकीय यंत्रणा इतर वेळी वाहतूक कोंडी झाल्यावर करताना दिसून का येत नाहीत. खासदार अमोल कोल्हे यांनी या एम. ई. पी. एल. कंपनी च्या दूषित व केमिकल युक्त पाण्या बाबत संसदेत आवाज उठवला होता तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही या कंपनीच्या प्रदूषणाबाबत तीन वर्षापूर्वी प्रदूषण नियंत्रण महामंडळाची चांगलीच खरडपट्टी काढली होती, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांना कंपनीच्या दूषित व केमिकल युक्त पाण्याचा अहवाल सादर करून दोषी वरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
तर आमदार अशोक पवार यांना आण्णापूर ग्रामपंचायतीने निवेदन देऊन या विषयात लक्ष घालण्याचे आवाहन केले असता आमदार अशोक पवार यांनी दूषित पाण्याच्या ठिकाणी भेट देऊन सदर प्रदूषणाचा प्रश्न आपण विधानसभेमध्ये मांडणार असल्याचे सांगितले. मात्र थोड्याच दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार असल्याने आमदार अशोक पवार विधानसभेमध्ये हा प्रश्न कधी मांडणार तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या प्रश्नावर संसदेमध्ये भाष्य करूनही अद्याप शासकीय पातळीवरती कुठली ही हालचाल होत नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान ग्रामस्थांच्या रेट्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पुणे येथे झालेल्या बैठकीत कंपनी पंधरा दिवस बंद ठेवण्याचे आश्वासन दिले. सदर कंपनी १५ दिवस बंद होऊन पुन्हा चालू झाली. मात्र शासनाने कुठलाही पत्र व्यवहार न करताच आश्वासन दिल्याने ग्रामस्थांना पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आली.
जर एवढे मंत्री आमदार खासदार यांनी पाठपुरावा करूनही ग्रामस्थांना स्वतःच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी रास्ता रोको चा पर्याय निवडावा लागत असेल तर शोकांतिकाच म्हणावी लागेल. कारण काही वर्षांपूर्वी खेड तालुक्यातील डाऊ केमिकल ही कंपनी ह.भ. प. बंडातात्या कराडकर व तिथे स्थानिक ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे बंद करावी लागली. मग शासन , प्रशासन व राजकीय नेते मंडळी या एम ए पी एल कंपनीला पाठीशी घालून निमगाव भोगी व परिसरातील नागरिकांच्या जीवाशी व भविष्याशी खेळत तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जमीन पाणी व हवा प्रदूषणामुळे निमगाव भोगी व परिसर रोज मरण जगत आहेत. अश्वस्थामाच्या जखमेसारखे अनेक व्याधी घेऊन ही माणसं संघर्षमय जीवन जगत आहेत. या नागरिकांचा हा संघर्ष थांबवण्यासाठी व रांजणगाव औद्योगिक वसाहती मधील व परिसरामधील भविष्यकाळातील पर्यावरण व्यवस्थित ठेवण्यासाठी या नागरिकांच्या आंदोलनाला यश येणे ही काळाची गरज आहे.
क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी सन २०१४ साली एम ई पी एल कंपनीच्या दूषित व रसायन युक्त पाण्यासंदर्भात आंदोलन केले होते. यानंतर कंपनीविरुद्ध प्रदुषण नियंत्रण मंडळाने फौजदारी गुन्हा दाखल केला होता. सातत्याने संजय पाचंगे हे कंपनीच्या प्रदुषणाविरुद्ध व नवीन भुखंड वाटपाविरुद्ध आवाज उठवत आहेत. २०१४ च्या आंदोलनाला आमदार अशोक पवार यांनी पाठिंबा दिला होता. मात्र भाजप चे उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे या आंदोलनापासून का दूर आहेत? का त्यांना दुर ठेवले जात आहे.? तर नुकत्याच रांजणगाव येथे महागणपती मंदिरासमोर पुणे नगर महामार्गावर झालेल्या आंदोलनामध्ये रांजणगाव कारेगाव व ढोकसांगवी या गावांमधील नागरिक दिसून आले नाहीत सदर प्रदूषणाच्या झळा या केवळ निमगाव भोगी कर्डीलवाडी सरद वाडी यांना नसून संपूर्ण एमआयडीसी परिसरालाच आहेत. निमगाव भोगी गाव जात्यात आहे तर बाकीची गावे सुपात आहे. जर या प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना हटवायचे असेल तर या सर्व गावांनी एक होणे गरजेचे आहे.





