गणेगाव येथील ओढ्यातील पाण्यामध्ये केमीकल सोडणाऱ्या आरोपीला रांजणगाव पोलिसांकडून अटक

रांजणगाव गणपती ( वार्ताहर ) : गणेगाव येथील ओढ्यातील पाण्यामध्ये केमीकल सोडणा-या आरोपीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अखेर अटक केली असून या गुन्ह्यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली. याबाबत गणेगाव खालसाचे ग्रामसेवक श्रीकांत वाव्हळ या निरांजन एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ११ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास गणेगाव खालसा गावचे हद्दीतील कामीनी ओढ्यामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी केमीकल सोडल्याने ओढ्यातील पाणी दुषित झाले होते. त्या केमीकलमुळे पाण्यचा रंगा लालसर होऊन सदर पाण्यामुळे मानवी व प्राणी जिवीतास धोका निर्माण झालेला होता.
कारण हे केमीकल युक्त पाणी कामीनी ओढ्यातुन पुढे कोंढापुरी येथील तळ्याला मिळत असल्याने व कोंढापुरी तलावातील पाणी आजुबाजुच्या रांजणगाव गणपती, शिक्रापूर, खंडाळे, गणेगाव खालसा या गावांना पिण्यासाठी व वापरासाठी पुरवठा होत असल्याने सदर प्रकरणांची पोलीस प्रशासन व महसुल प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती.
सदर घटनास्थळी देवकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के,पोलीस निरीक्ष महादेव वाघमोडे यांनी भेट देवुन पहाणी करून सदरचे पाणी कोंढापुरी तलावामध्ये जाऊ नये यासाठीच्या उपाय-योजना केल्या होत्या. गणेगाव खालसा गावचे ग्रामसेवक श्रीकांत सुखदेव वाव्हळ यांच्या फिर्यादीवरून 13 जुलै रोजी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरच्या दुषित पाण्यामुळे ओढ्यातील वनस्पती करपटुन, मासे मरण पावले होते त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र गोपनिय माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदर गुन्हयातील आरोपी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी शोधून काढला. किशोर दशरथ मोरे (वय 36 वर्ष धंदा ड्रायव्हर रा. बेकराईनगर हडपसर ता. हवेली जि.पुणे) हा पुणे रेल्वस्टेशन येथुन परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्यास तपास पथकाने ताब्यात घेऊन 17 जुलै रोजी अटक करून शिरुर येथील न्यायालयात हजर केले असता 20 जुलै पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिले आहे.
आरोपीने त्याच्याकडील टॅन्कर क्र. MH 04 HD 4530 यामध्ये रांजणगाव औद्योगिक वसाहती मधील नामांकित कंपनी मधुन दि. ९ जुलै रोजी ३५ टन हायड्रोक्लोरीक ॲसिड भरुन ते सुखा केमीकल कंपनी, बडोदरा, गुजरात येथे खाली करण्यासाठी भरले होते. परंतु यातील आरोपी याने सदरचे केमीकल हे संबंधित कंपनीमध्ये खाली न करता गणेगाव हद्दीतील कामिनी ओढ्यातील पाण्यामध्ये सोडुन दिले आहे. सदरचे ॲसिड हे सुखा केमीकल कंपनीमध्ये जमा केल्याची बनावट पावती तयार करुन संबधित कंपनीस पाठविली होती. त्यानुसार सदर दाखल गुन्हयात इतर कोणाचा सहभाग आहे काय, यापुर्वी असा प्रकार कोठे केला आहे काय याबाबत पुढील अधिक तपास चालु आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे,उमेश कुतवळ,विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार,संदिप जगदाळे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडकेन हे करत आहेत.





