महसूल सप्ताह 2025: रांजणगाव गणपती येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न

शिरूर- महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस कृती आराखडा आणि महसूल विभागाच्या निर्देशानुसार “महसूल सप्ताह २०२५” अंतर्गत रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.
या शिबिरात “जिवंत सातबारा” मोहिमेअंतर्गत खातेदारांच्या वारस नोंदी करून सातबारा आणि फेरफार दुरुस्ती करण्यात आली. याशिवाय, उत्पन्न, जात, रहिवासी, अल्पभूधारक, बिनविरोध आदी दाखले मान्यवरांच्या हस्ते खातेदारांना प्रदान करण्यात आले. सामाजिक आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले, ज्यामुळे शेतकऱ्यांना योजनांचा थेट लाभ मिळण्यास मदत झाली.
शिबिरात महसूल विभागासह कृषी, पंचायत समिती, भूमी अभिलेख, आरोग्य, सेतू नागरी सुविधा केंद्र, सामाजिक वनिकरण, पशुवैद्यकीय, पाटबंधारे, महिला व बालकल्याण, वन आणि महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. प्रलंबित फेरफार प्रकरणे जलदगतीने निकाली काढणे, खातेदारांना त्वरित सेवा पुरवणे आणि शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
“या उपक्रमास ग्रामस्थ, शेतकरी आणि लाभार्थी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकाच ठिकाणी विविध विभागांच्या सेवा मिळाल्यामुळे नागरिकांना वेळ व खर्च वाचल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त करण्यात आले.” – स्वाती तावरे (मंडल आधिकारी, रांजणगाव गणपती)


