पुणे जिल्हा: कारेगावात सोमवारी जरांगे यांची सभा

रांजणगाव गणपती – मुंबई येथे मराठा आरक्षण संदर्भात आंदोलन करण्यासाठी मराठा आरक्षण क्रांतीयोध्दे मनोज जरांगे पाटील हे शिरुर मार्गे मुंबई येथे जाणार असून रांजणगाव गणपती जवळील कारेगाव येथे सोमवारी (दि. 22) मनोज जरांगे पाटील याचा मुक्काम व जाहीर सभा होणार आहे.
यासंदर्भात करावयाचा नियोजनाबाबत न्हावराफाटा (ता. शिरुर) येथील कानिफनाथ मंगल कार्यालयात समस्त सकल मराठा समाज शिरुर यांची बैठक झाली. बैठकीत आंदोलनकर्त्यांसाठी भोजन, निवास, पाणी, चहा-नाष्टा व अन्य बाबी संदर्भातील नियोजना संदर्भात चर्चा झाली. जरांगे यांची सभा व मुक्काम कारेगाव येथील पुणे नगर रोड वरील व्हर्लपूल समोरील 100 एकरांहून अधिक जागा असणार्या ठिकाणी होणार असून, या ठिकाणीच सभा व आंदोलनकर्त्यांच्या मुक्काम होणार आहे.
या बैठकीला शेखर पाचुंदकर पाटील, संजय बारवकर, श्यामकांत वर्पे, आबासाहेब सोनवणे, श्रीनिवास घाडगे, राजेंद्र जगदाळे, नानासाहेब लांडे, संभाजी कर्डिले, भास्कर पुंडे, जयवंत साळुंखे, शोभना पाचंगे, वर्षा काळे, सुदाम कोलते, राणी कर्डिले, गणेश खोले, उमेश शेळके, योगेश महाजन, अविनाश जाधव, के. बी काळे, वीरेंद्र कुरुंदळे, सचिन जाधव, रमेश दसगुडे, विलास बत्ते, गीताराणी आढाव, रुपेश घाडगे, आदित्य बो-हाडे, सत्वशीला पाचंगे, शामराव खरबस, कुमार नाणेकर आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
घराघरांतून देणार चपाती, चटणी
शिरुर तालुका व शहरातून घराघरांतून आंदोलनकर्त्यांसाठी चपाती व शेंगदाणा चटणीचे संकलन करण्यात येणार आहे. त्या बरोबर विविध गावांतून बुंदीचेही संकलन करण्यात येणार आहे. यास सर्वांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याखेरीज शहर व तालुक्यातून रुग्णवाहिकाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पुणे नगर रस्त्यावर विविध ठिकाणी पिण्याचा पाण्याचे टॅकर व फूड पॅकेटस, चहा यांचे वाटप करण्यसंदर्भात नियोजन करण्यात आले आहे.




