Ranjangaon Crime | धक्कादायक! शेजारीच ठरले अपहरणकर्ते ; पोलिसांनी पंजाबपर्यंत पाठलाग करूण केली मुलाची सुटका

प्रभात वृत्तसेवा
रांजणगाव गणपती – विश्वास ठेवून सांभाळायला दिलेल्या तीन वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या परप्रांतीय दांपत्याच्या मुसक्या आवळण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी पंजाबमधील लुधियाना येथून मुलाची सुखरूप सुटका केली असून, आरोपींना अटक केली आहे. अवघ्या काही दिवसांत पार पाडलेल्या या धाडसी कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कारेगाव येथे राहणाऱ्या काजल पडघाण यांनी आपला तीन वर्षांचा मुलगा आयुष याला शेजारी राहणाऱ्या पूजादेवी आणि अर्जुन यादव या दांपत्याकडे सांभाळायला ठेवले होते.
१२ सप्टेंबर रोजी हे दांपत्य मुलासह फरार झाले. दोन दिवस वाट पाहून काजल यांनी १५ सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल केली.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात व सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे यांना तातडीने लुधियाना येथे रवाना करण्यात आले. पंजाब पोलिसचे निरीक्षक सुरेशकुमार रामल व गुरमित सिंग यांच्या सहकार्याने रांजणगाव पोलीसांनी कारवाई केली.
लुधियाना येथे मुलाला ताब्यात घेतले व आरोपी दांपत्याला अटक केली. या गुन्ह्यांचा पुढील अधिक तपास रांजणगाव पोलिसचे सहायक निरीक्षक अशोक चव्हाण करत आहेत.रांजणगाव एमाआयडीसी पोलिसांच्या तत्परतेमुळे अपहृत बालक सुरक्षितपणे परत मिळाले असून आयुषच्या नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले. या कामगिरीमुळे रांजणगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.





