Ranjangaon Accident : पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारच्या धडकेत तरुण डॉक्टरचा मृत्यू
Ranjangaon Accident : हॉटेल अमर इन जवळ दुभाजकातून वळताना पाठीमागून येणाऱ्या कारने दुचाकीला चिरडले; कार चालक विद्यानंद राऊत पोलिसांच्या ताब्यात.

Ranjangaon Accident – येथील पुणे-नगर महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत डॉ. श्रीकृष्ण विष्णू कांदे यांचा मृत्यू झाला, तर डॉ. श्रीकांत बाजीराव शिवले हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कार चालक विद्यानंद सदाशिव राऊत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. श्रीकृष्ण कांदे आणि डॉ. श्रीकांत शिवले हे दोघे एम एच ०२ सी वाय ०७२६ या दुचाकीवरून अहिल्यानगरकडे जात होते.
हॉटेल अमर इन जवळ दुभाजकातून वळण घेत असताना पाठीमागून आलेल्या एम एच १२ वाय डी ३९३६ या कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातामध्ये दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉ. श्रीकृष्ण विष्णू कांदे (वय २६, रा. संकल्प सिटी, रांजणगाव) यांचा मृत्यू झाला.
या अपघातात डॉ. श्रीकांत बाजीराव शिवले (वय ३४, रा. नवी सांगवी, पिंपरी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत डॉ. सौरभ भालचंद्र लोणकर (वय २७, रा. बारामती) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कार चालक विद्यानंद सदाशिव राऊत (सध्या रा. लोणीकंद, मूळ रा. वाशीम) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारुती पासलकर करत आहेत.





