नितेश राणेंच्या जाचाला कंटाळूनच राणे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश;सेनेचा खोचक टोला

सिंधुदुर्ग : वैभववाडी नगरपंचायतमधील 7 राणे समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होत आहे. हे सर्व नेते भाजप आमदार नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत आहेत,’ असा टोला विद्यमान शिवसेना नेते आणि पूर्वी नारायण राणे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सतीश सावंत यांनी लगावला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी राणे कुटुंबावर सडकून टीका केली.
‘वैभववाडी नगरपंचायतमधील 7 राणे समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होत आहे. हे सर्व नेते भाजप आमदार नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. प्रवेश करत असलेले सर्व 7 माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आणि नगरसेवक आहेत. या सर्वांचा पक्षप्रवेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे,’असे सतीश सावंत म्हणाले.
अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर भाजपचे 7 कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नारायण राणे यांना हा फार मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे या नेत्यांच्या जाण्याने भाजपला कोणताही फरक पडणार नसून वैभववाडी नगरपंचायतीत संपूर्ण 17 जागा भाजपच जिंकेल असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी केला.
‘आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळणार नाही यामुळे या सात नगरसेवकांनी हे पाऊल उचलले आहे. वैभववाडीत भारतीय जनता पक्ष मजबूत आहे. दोन महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजप 17 जागेवर जिंकेल. भारतीय जनता पक्ष इथे मजबूत आहे. अमित शहा आल्यानंतर भाजपा आणखी मजबूत झाला आहे. अमित शहांचे पाय जिथे जिथे लागतात तिथे तिथे भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलतं हा देशातला इतिहास आहे. भारतीय जनता पक्ष मजबुतीने उद्याच्या निवडणुकांना सामोरे जाईल,’ असे राजन तेली म्हणाले.





