Ramwadi to Wagholi metro | वाघोली मेट्रो आणि उड्डाणपूलाचं काम कोण करणार? ; अखेर तिढा सुटला
प्रभात वृत्तसेवा
वाघोली – पुण्यातील रामवाडी ते वाघोलीदरम्यान मेट्रो मार्गिका आणि डबलडेकर उड्डाणपूल या दोन्हीचे काम नक्की कोण करणार, याचा तिढा सोडवण्यात अखेर यंत्रणांना यश आले आहे. रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गिकेचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) करणार असून, वाहनांसाठीचा उड्डाणपूलदेखील महामेट्रोकडून उभारला जाणार आहे. त्यानंतर वाघोलीच्या पुढील दुहेरी महामार्गाचे काम महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाकडून करण्यात येणार आहे.
या डबलडेकर प्रकल्पासाठी अंदाजे 3626 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. डबलडेकर संरचनेमुळे खर्चात वाढ होणार असून, हा अतिरिक्त खर्च एमएसआयडीसीकडून महामेट्रोला दिला जाणार आहे. वाघोलीच्या पुढील मार्गाचे काम मात्र एमएसआयडीसीच्या अखत्यारीत राहील. रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) दरम्यानचा 11. 63 किमी लांबीचा विस्तारित मेट्रो मार्ग केंद्र सरकारकडून मंजूर झाला आहे; मात्र याच मार्गावर उड्डाणपुलासाठी एमएसआयडीसीने निविदा काढल्याने कोणत्या संस्थेकडून काम होणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.
या संदर्भात महामेट्रो, एमएसआयडीसी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची बैठक झाली. त्यामध्ये महामेट्रोकडून हे संपूर्ण काम करण्यावर शिक्कामोर्तब झाले.सध्या मेट्रोच्या कामासाठी कर्जाच्या स्वरूपात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, या विस्तारित मार्गासाठी लागणारा खर्च कसा उभारायचा, याबाबत लवकरच स्वतंत्र बैठक होणार आहे. त्यात निधीची तरतूद निश्चित करून कामाला गती दिली जाईल, अशी माहिती महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकार्यांनी माध्यमांना दिली.




